मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) आज कोकण व मध्य महाराष्ट्र विभागासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात अति मुसळधार पावसासह समुद्रावरून किनारी भागाकडे जोरदार वारे वाहतील. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. नाशिकमध्येही जोरदार पावसाची शक्यता आहे.
नाशिकमध्ये आज जोरदार पाऊस दिसत आहे. आज दिवसभरात आतापर्यंत गुजरातला लागून असलेल्या पेठमध्ये 97 मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. इगतपुरीत 73 तर त्र्यंबकेश्वरमध्ये 65 मिमी पाऊस झाला आहे. नाशिकमध्ये शहरी भागात पावसाचा जोर कमी आहे. पुण्यात लवासा क्षेत्रात 105, लोणावळ्यात 94, निमगिरी 81, गिरीवन 73 आणि माळीणमध्ये 60 मिमी पाऊस झाला आहे. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्येही शहरी भागात पाऊस कमी आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
माथेरानमध्ये सर्वाधिक पाऊस; रायगड-ठाणे जिल्ह्यात धुंवाधार
माथेरानमध्ये आज आतापर्यंत राज्यातील सर्वाधिक 185 मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे. याशिवाय, रायगडात पेन 145, खालापूर 144, कर्जत 131, माणगाव 108, पनवेल 97, महाड-म्हसळा 95, पोलादपूर 84, तळा 83, सुधागड 72, रोहा 63 मिमी असा धुवांधार पाऊस सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातही तुफानी पाऊस सुरू आहे. ठाण्यातील शहापूरमध्ये 123, मुरबाडमध्ये 120, अंबरनाथमध्ये 95, उल्हासनगरमध्ये 93, भिवंडीत 73 तर कल्याणमध्ये 63 मिलिमीटर इतक्या पावसाची आतापर्यंत नोंद झाली आहे.
सिंधुदुर्गात देवगडमध्ये 74, वैभववाडी 66, मालवण 63 आणि कुडाळमध्ये 60 मिमी पाऊस नोंदविला गेला आहे. पालघरमध्ये 89, जव्हारमध्ये 85, तर वाड्यात 65 मिमी पाऊस झाला आहे. कोल्हापूरमध्ये गगनबावडा तालुक्यात 92 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
जळगाव, धुळ्यात पावसाचा अलर्ट नाही
वरील फोटोत राज्यात आज दिवसभरासाठी “आयएमडी”ने पावसाचे दिलेले जिल्हानिहाय अलर्ट दिसत आहेत. हिरव्या भागासाठी कोणताही विशेष अलर्ट नाही. त्यानुसार, जळगाव, धुळ्यात पावसाचा अलर्ट दिसत नाही.
आजचे जिल्हानिहाय अलर्ट
ऑरेंज अलर्ट : सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, नाशिक, पुणे
यलो अलर्ट : कोल्हापूर, सातारा, नंदुरबार, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ
दुपारी 12 वाजता “इस्रो”च्या उपग्रहाचे टिपलेली स्थिती
वरील छायाचित्रात आज दुपारी 12 वाजता “इस्रो”च्या उपग्रहाचे टिपलेली देशभरातील पावसाच्या ढगांची ताजी स्थिती दिसत आहे. यातील पिवळ्या, लाल, तांबड्या, काळ्या रंगाच्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्राकडे पावसाच्या ढगांची आगेकूच
आज दुपारी बारा वाजेच्या इस्त्रो उपग्रहाने टिपलेल्या स्थितीत मुंबई व गुजरातच्या किनारी भागाकडून पावसाचे ढग हे उत्तर-मध्य महाराष्ट्राकडे सरकताना दिसत आहेत. निळा, आकाशी, जांभळा व लाल या चढ्या क्रमाने हलका, मध्यम, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तर-मध्य महाराष्ट्राकडे पावसाच्या ढगांची आगेकूच
गुजरातमध्ये रेड अलर्ट; गोव्यात ऑरेंज अलर्ट
रडारच्या आकलनानुसार, आज दुपारी 2 वाजेच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रातील पावसाची स्थिती वरील फोटोत दर्शविल्यानुसार राहू शकते. यातील पिवळा, तांबडा, लाल भाग हा जोरदार पावसाचा असेल. तर हिरव्या भागात हलका ते मध्यम पाऊस होऊ शकेल.
गुजरातमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. किनाऱ्यालगतच्या भागात आज जोरदार वारे वाहतील आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल. सौराष्ट्र आणि कच्छ भागातही अतिवृष्टीची शक्यता आहे. गोव्यातही आज मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय, जोरदार वाऱ्यांची शक्यता आहे.
राज्यात आणखी 4-5 दिवस पावसाचेच
पुणे वेधशाळेचे प्रमुख हवामान शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी येत्या 5 दिवसात राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. 2 जुलै पासून मुसळधार पावसाचा नवीन स्पेल सुरू होण्याची शक्यता आहे. त्याचा प्रभाव दक्षिण भारतातील भागांत व संलग्न भागावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातही 4 ते 5 दिवशी याचा प्रभाव असेल, असे होसाळीकर यांनी म्हटले आहे.