मुंबई : दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकार प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान देणार आहे. यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांच्या सबसिडीसोबत 32 रुपयांचा दर मिळणार आहे.
राज्याच्या दूध दराच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि. 4) रोजी नागपूर येथे बैठक झाली होती. त्यानंतर दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही अनुदान योजना राज्यातील सहकारी दूध संघामार्फत राबविण्यात येणार आहे. सहकारी दूध संघानी दूध उत्पादक शेतकऱ्यांना 3.2 फॅट / 8.3 एसएनएफ या प्रती करिता किमान 29 रुपये प्रति लिटर इतका दर बँक खात्यावर ऑनलाईन जमा करायचा आहे. यानंतरच शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यावर डीबीटीद्वारे देण्यात येणार आहे.
ही योजना या तारखेपर्यंत लागू
नोव्हेंबर 2023 मधील आकडेवारीनुसार, 43.69 लाख लिटर दूध सहकारी दूध संघामार्फत संकलित करण्यात येते. 5 रुपये प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 2 महिन्यासाठी 135 कोटी 44 लाख इतके अनुदान आवश्यक असेल. तसेच या योजनेचा कालावधी हा 1 जानेवारी ते 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे. दरम्यान, डीबीटी करण्यासाठी बँक खाते हे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक असणार आहे. तसेच याची पडताळणी करणं आवश्यक राहील.