नाशिकसह उत्तर-मध्य महाराष्ट्रात आज मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD) वर्तविली आहे. आज, शुक्रवार 8 सप्टेंबर रोजी कोकण परिसरात तसेच मध्य आणि उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी 20 ते 60 मिलिमीटर इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे. या भागात पावसाची शक्यता (प्रोबाबिलिटी) 50-80% इतकी आहे.
परवा रात्रीप्रमाणेच काल रात्रीही राज्यात बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने तडाखा दिला. माळशेजजवळ खिरेश्वर येथे सकाळी 7:45 पर्यंत 155 मिमी, तर भीमाशंकर 147 मिमी आणि खंडाळा येथे 120 मिमी पाऊस नोंदविला गेला. मुंबई व लगतचा भाग, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे आणि अहमदनगर जिल्हा क्षेत्रांतही जोरदार पाऊस झाला. आजही राज्यातील आकाश ढगांनी व्यापलेले आहे. आज दिवसभर राज्यातील घाट भागात मुसळधार पाऊस सुरू राहू शकतो.
10 सप्टेंबरनंतर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र : मुंबई, ठाणे, पालघर आणि लगतच्या भागात पावसाने सध्या विश्रांती घेतल्याचे दिसते. मात्र, काल रात्री घाट परिसर पावसात धुवून निघाला. आज सकाळी 11 वाजल्यापासून पावसाचा जोर पुन्हा वाढेल. पालघर, डहाणू, मुंबई आणि लगतच्या भागात या काळात मुसळधार पाऊस होऊ शकतो. त्यानंतर पावसाची तीव्रता कमी होईल. मुंबई-ठाणे शहरातील वेगळ्या भागात पाणी साचण्याची शक्यता महापालिकेने वर्तविली आहे. दरम्यान, 10 सप्टेंबरनंतर मुंबईच्या आसपास आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे.
पुणे हवामानाचा अंदाज : आकाश सामान्यत: ढगाळ राहण्याची शक्यता. काही भागात मध्यम ते तीव्र सरी, साधारणतः हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता, घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता. खडकी, सांगवी, विश्रांतवाडी, पिंपळे गुरव, बालेवाडी, पिंपळे निलख व लगतच्या भागात सकाळी पावसाचा जोर राहू शकेल.
गुजरात, मध्य प्रदेशातही जोरदार पाऊस : पश्चिम मध्यप्रदेश आणि पूर्व गुजरात सीमा प्रदेशात रविवार 10 सप्टेंबरपर्यंत एकूण 80-120 मिमी इतका मुसळधार पाऊस पडू शकतो. गुजरातमध्ये सुरत, वलसाड भागात तसेच नवसारी, भरूचमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. रविवार 10 सप्टेंबरपर्यंत बडोदा भागात 60-100 मिमी पर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो. अहमदाबाद प्रदेश आणि सौराष्ट्रात फक्त हलका पाऊस पडू शकतो.