मुंबई : शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन हप्त्यात 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले जातात. तसेच महाराष्ट्र सरकारनेही नमो शेतकरी महासन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून वर्षाला तीन हप्त्यांत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जात आहेत.
दरम्यान, सरकारला अनेकदा असे दिसून आले की पात्र नसलेल्या व्यक्ती या योजनेचा लाभ घेत आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे. चला तर जाणून घेऊया काय आहेत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची नवीन नियमावली.
असे आहेत योजनेचे नवीन नियम
ज्या शेतकऱ्याने 2019 नंतर जमीन खरेदी केली असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच 2019 पूर्वी जमीन खरेदी केलेल्या शेतकऱ्यालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
तसेच आता या योजनेचा अर्ज करण्यासाठी पती, पत्नी आणि मुलांचे आधारकार्ड जोडीनेही आवश्यक आहे.
जर शेतकऱ्याच्या कुटुंबातील कुणाचे निधन झाले असेल आणि त्याला वारसा हक्काने जमीन मिळाली असेल, तर या योजनेचा फक्त एकच व्यक्ती लाभ घेऊ शकतो.
सरकारी किंवा निमसरकारी नोकरी असलेल्या किंवा कर भरणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
नवीन अर्जासाठी ही आहेत आवश्यक कागदपत्रे
शेतकर्याच्या नावाचा नवीन सातबारा
अर्ज केलेल्या शेतकर्याच्या फेरफारमध्ये मयत व्यक्तीचा मृत्यू 1 फेब्रुवारी 2019 पूर्वीचा असेल तर एकच फेरफार
फेब्रुवारी 2019 नंतर मृत्यू झाला असेल तर पूर्वीचा व नंतरचा असे दोन्ही फेरफार
पती, पत्नी व मुलांचे आधार कार्ड
रेशन कार्ड