मुंबई : मान्सूनची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांना लवकरच आनंदाची बातमी मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील पाऊस मंदावला आहे. मात्र, आता उत्तर – मध्य महाराष्ट्रात पुढील 5 दिवस मान्सून सक्रिय होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून मान्सूनची वाटचाल मंदावली होती. दरम्यान, आता अरबी समुद्रतील मान्सूनच्या शाखेने जोर पकडला असून पुढील तीन दिवसात कोकणातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे. तसेच पुढील 4 ते 5 दिवस उत्तर – मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
कोकणातील जिल्ह्यांमध्ये आज तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच उत्तर – मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये आज हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
शेतातील खोळंबलेल्या पेरण्या पूर्ण होणार
मान्सून नागपूरसह पूर्व विदर्भात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यापूर्वी मान्सून राज्याच्या विविध भागात दाखल झाला. मात्र, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीत मान्सूनने हजेरीच लावली नाही. अखेर मान्सूनचे त्या ठिकाणी आगमन झाले आहे. मान्सूनअभावी वातावरणात उकाडा जाणवत होता. बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण झाल्याने मान्सूनच्या ढगांनी जोर पकडला आहे. शेतकऱ्यांना खोळंबलेल्या पेरण्याही आता पूर्ण करता येणार आहेत.
देशात आतापर्यंत 77 मिमी पाऊस
देशात आतापर्यंत (1 ते 20 जून) 77 मिमी पाऊस पडला असून या कालावधीतील पावसाच्या तुलनेत हे प्रमाण 17% कमी आहे. 1 ते 20 जूनपर्यंत देशात 92.8 मिमी पाऊस पडतो, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) म्हंटले आहे.