मुंबई : Monsoon Update मान्सून काल, रविवारी तळकोकणात दाखल झाला. मान्सून येत्या 2 दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, असा भारतीय हवामान खात्याचा (IMD) अंदाज आहे. मात्र, मान्सून आला तरी शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषी खात्याने केले आहे.
अरबी समुद्रातील बिपोरजॉय चक्रीवादळामुळे अंदमानबाहेरच खोळंबलेल्या मान्सूनचे परवा केरळमध्ये आगमन झाले. त्यांनतर 48 तासातच त्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला धडक दिली. लगोलग गोव्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात, तळकोकणात काल मान्सून पोहोचला. त्यामुळे दक्षिण कोकण आणि दक्षिण-मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल मान्सूनच्या धारा बरसल्या. ‘आयएमडी’ने राज्यात मान्सून दाखल झाल्याचे काल अधिकृतरित्या जाहीर केले. आता येत्या 48 तासांत हा मान्सून महाराष्ट्रभर पोहोचेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. म्हणजे मंगळवार – बुधवारपर्यंत मान्सूनचा पाऊस राज्यात सर्वदूर दाखल होण्याची शक्यता आहे.
“स्कायमेट”च्या अंदाजानुसार मान्सून…
“स्कायमेट”कडून मात्र अजूनही मान्सूनची अधिकृत आगेकूच जाहीर झालेली नाही. बिपरजॉय चक्रीवादळ सध्या गोवा, महाराष्ट्र ओलांडून गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ भागाकडे निघालेले आहे. पाकिस्तानमार्गे येमेनकडे पोहोचण्याचा चक्रीवादळाचा आधीचा अंदाजित मार्ग काहीसा बदललेला आहे. त्यामुळे महाराष्ट्र किनारपट्टीचा धोका पूर्णतः टळलेला आहे. आता गुजरात किनारपट्टीवर ताशी 150 किलोमीटर व त्याहून अधिक वारे वाहण्याचा अंदाज आहे. “स्कायमेट”च्या अंदाजानुसार, 15 जून रोजी पाकिस्तानात कराचीच्या आसपास चक्रीवादळ समुद्रात विसर्जित होऊ शकते. त्यानंतरच भारतात मान्सून खऱ्या अर्थाने सक्रीय होईल. त्यांच्या अंदाजानुसार, तूर्तास मान्सून कमजोर आहे. त्यामुळे “स्कायमेट”च्या अंदाजानुसार, 15 जूननंतरच मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापू शकेल.
पंतप्रधानांनी ‘बिपरजॉय’च्या पार्श्वभूमीवर’ घेतली बैठक
मुंबई आणि गुजरातच्या किनाऱ्याला बिपरजॉय चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीची बैठक बोलावून चक्रीवादळासंबंधी माहितीचा आढावा घेतला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेते आणि अधिकारी उपस्थित होते.