मुंबई : मे महिना सुरु आहे. त्यातच काही भागात उष्णता तर काही भागात अवकाळी पाऊस सुरु आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याकडून (IMD) मोठी अपडेट समोर आली आहे. मान्सून अंदमान भागात दाखल झाला असून मान्सूनचा पुढील प्रवास कसा असणार हे आज आपण जाणून घेणार आहोत.
गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील तापमानात घट झाल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणामुळे मान्सून महाराष्ट्रात लवकर दाखल होण्याची अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कारण अंदमान समुद्रात मंगळवारी मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. अंदमान आणि निकोबार बेटांमध्ये पाऊस सुरु असून पुढील 48 तासात असेच पर्जन्यमान येथे कायम राहणार आहे, अशीही शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे.

मान्सूनचा पुढील प्रवास असा
मान्सून अंदमानानंतर बंगालच्या उपसागराचे काही क्षेत्र व्यापेल.
त्यानंतर अरबी समुद्राचा दक्षिण भाह, मालदीव, कोमोरिन भागापासून पुढे सरकणार
महाराष्ट्रात कधी दाखल होणार ?
यंदा मान्सून अंदमानात वेळेआधीच दाखल झाला आहे. म्हणजेच 8 ते 10 दिवस आधीच दाखल झाल्यामुळे आता तो 25 ते 27 मे दरम्यान केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. तर मान्सून 2 जूनपर्यंत तळकोकणात दाखल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होण्यास सुरुवात होईल.