मुंबई : शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून केरळमध्ये दाखल झाला असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. केरळच्या कोट्टयम जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
भारतीय हवामान विभागाने 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज दिला होता. मात्र, मान्सून वेगाने चाल करत असून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. हा मान्सूनचा प्रवास आता तसाच पुढे होणार असून केरळ प्रमाणेच ईशान्य भारतातही मान्सूनने आगेकूच केली असून पाऊस हजेरी लावणार आहे.
महाराष्ट्रात मान्सून कधी ?
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात मान्सून हा 10 जून रोजी दाखल होईल. त्यामुळे उन्हाने हैराण झालेल्यांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान, रेमल चक्रीवादळामुळे मान्सूनचे लवकर आगमन झाले असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
मान्सूनचे केरळमधील आगमन कसे ठरते ?
हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी दोन वर्षांपूर्वी यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करुन मान्सूनचे केरळमधील आगमन कसे ठरते ?याबाबतचे निकष सांगितले होते. ते खालीलप्रमाणे….
पाऊस :14 स्टेशन्स पैकी, 60% स्टेशन्सने 2 दिवस 2.5 mm किंवा जास्त पावसांची नोंद करणे (10 मे नंतर), तर दुसऱ्या दिवशी
वारे फील्ड : वेस्टरलीज़ची उंची (Westerly winds) 600 hpa पर्यंत असणे, गती 15-20kts
आउटगोइंग लाँगवेव्ह रेडिएशन < 200wm-2
14 स्टेशन्स कोणते?
केरळमधील 14 स्टेशन्सवर 10 मे नंतर 60 टक्के स्टेशन्सवर 2 दिवस 2.5 mm पाऊस होणे आवश्यक असते. यात मिनिकॉय, अमिनी, थिरुवनंतपुरम, पुनालूर, कोल्लम, अल्लापुझा, कोट्टयम, कोची, थ्रिसूर, कोझिकोडे, थलासरी, कन्नूर, कुडूलू, मंगलोर या 14 स्टेशन्सचा समावेश आहे.