मुंबई : विदर्भात आज जोरदार वारे वाहणार असून काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तविलेल्या शास्त्रीय अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्राला मात्र अजून चांगल्या पावसासाठी 3-4 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Monsoon Delayed North Maharashtra No Rain IMD Projection)
राज्याच्या बहुतांश भागात पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्याची परिस्थितीही बिकट होत चालली आहे. जूनचा तिसरा आठवडा संपायला आला तरी मान्सूनच्या पावसाला अजून सुरुवात न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पेरणी खोळंबल्याने खरीप हंगाम लांबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
टोळंबीचे तेल…! ऐकले आहे का..?… पहा हा खास व्हिडीओ
https://youtu.be/fyG9PJEeu1o
हवामान खात्याचा येत्या तीन दिवसांचा अंदाज असा –
गुरुवार, 22 जून
विदर्भात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. (वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 कि.मी.)
शुक्रवार, 23 जून व शनिवार, 24 जून :
कोकणात व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. (वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 कि.मी.)
मराठवाडयात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.
पुणे प्रादेशिक हवामान खात्याचे शास्त्रज्ञ के.एस. होसाळीकर यांनी मुंबई प्रादेशिक हवामान विभाग आणि नागपूर हवामान विभागाच्या निरीक्षणाचा हवाला दिला आहे. त्यानुसार, कोकणातील काही भागात 23 जूनपासून, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता.
उत्तर महाराष्ट्र कोरडाच राहण्याची शक्यता
या बातमीसोबत असलेले उपग्रह छायाचित्र मॉडेल अनुमान पाहा. हा 26 जूनपर्यंतचा पावसाचा अंदाज आहे. या नकाशातील पिवळ्या रंगाच्या भागात 1 ते 10 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. हिरव्या भागात 10 ये 20 मिमी, गडद हिरव्या भागात 20-40 मिमी, निळ्या भागात 40 ते 70 मिमी, गडद निळ्या भागात 70 ते 130 मिमी आणि भगव्या-लाल भागात 130 ते 200 मिलिमीटर पावसाची शक्यता आहे. हे अनुमान पाहिले असता, 26 जून सकाळपर्यंत उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक व अहमदनगर या पाच जिल्ह्यात फारशा चांगल्या पावसाची अपेक्षा धरता येत नाही. नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी 10-20 मिमीपर्यंत हलका पाऊस होण्याची शक्यता असली तरी जळगाव, धुळे व नंदुरबार या तीन जिल्ह्यात येत्या 3-4 दिवसात पावसाचे कोणतेही अनुमानित चिन्ह दिसत नाही.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषि सल्ला
कोकण विभागातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्हयातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो, की भात व भाजीपाला रोपवाटीकेच्या चारही बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी.
विदर्भातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की,
1. सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशीरा, भाजीपाला आणि फळबागाना तग धरुन राहण्याइतके हलके आणि वारंवार पाणी द्यावे,
2. उष्णतेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी गोठ्याचे छत गवत / पेंढ्याने झाकलेले असावे. शेडभोवती पडदे लटकवावे आणि शेडच्या छतावर गोण्या / गवत लावून त्यावर पाणी शिंपडावे.
मराठवाडा व विदर्भातील शेतकऱ्यांना सल्ला देण्यात येतो की,
1. फळ बागांना व भाजीपाला पिकांना बांबूचा किंवा काठीचा आधार द्यावा.
2. मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याच्या कालावधीत जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.