मुंबई : भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या मान्सून अलर्टनुसार (Monsoon Alert), तळकोकणात अडकलेला पाऊस आता 13 दिवसांनंतर अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पाऊस आज महाराष्ट्रात सर्वदूर दमदार बरसणार असल्याचे अनुमान आहे. एकीकडे, अरबी समुद्रातील शाखा सक्रीय होऊन कोकण-मुंबईमार्गे पाऊस राज्यात शिरतोय. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात आधीच सक्रीय झालेल्या शाखेमुळे पाऊस मुंबईआधी विदर्भात जाऊन पोहोचला आहे.
गेले 13 दिवस रखडलेला आणि तळकोकणात अडकून पडलेल्या मान्सूनने शनिवारी पुन्हा जोर धरला. बंगालच्या उपसागराची शाखा आधीच सक्रीय होती. अरबी समुद्रातील शाखाही आता सक्रिय झाली. त्यामुळे मान्सूनलाही वेग आला आहे. शनिवारी मान्सून कोकणाच्या उत्तरेतील अलिबाग ओलांडून मध्य महाराष्ट्रात शिरला. मराठवाड्यात थेट उदगीर आणि पुण्याहून सोलापूरपर्यंत मान्सूनने मजल गाठली. विदर्भात नागपूर त्याने आधीच गाठले होते. आता अनुकूल हवामान असल्याने मान्सून येत्या दोन दिवसात मुंबई-पुण्यासह बहुतांश महाराष्ट्रात पोहोचेल, असा IMDचा अंदाज आहे.
अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी मान्सून मुंबई-पुण्यात पोहोचल्याचेही दिसत आहे. कारण मुंबईत अनेक ठिकाणी काल 200 मिमी पर्यंत पाऊस झाला. पुण्यातही 135 मिमीहून अधिक पाऊस बरसला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास शेवटच्या आठवड्यातच राज्यभरातील जून महिन्याची सरासरी गाठली जाण्याची शक्यता आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
मान्सून शुक्रवारी कोकणच्या दक्षिण भागात सक्रीय झाला होता. त्यानंतर काल, शनिवारी अलिबागपर्यंत ही कोकणातील मान्सूनरेषा पुढे सरकली, असे हवामान खात्याने अधिकृतरित्या जाहीर केले आहे.
मान्सून मुंबई-पुण्यात, आज होऊ शकते अधिकृत घोषणा
प्रादेशिक हवामान विभाग, मुंबईच्या अनुमानुसार पुढील दोन दिवसात मान्सूनचे मुंबईत आगमन होण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसत आहे. मान्सूनचे निकष पूर्ण झाल्यानंतरच त्याचे मुंबईतील आगमन जाहीर केले जाईल, असे “आयएमडी”ने म्हटले आहे. काल, शनिवारी मुंबईत बरसलेला जबरदस्त पाऊस शहरातील मान्सून आगमन जाहीर करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. अजून अधिकृतरित्या मान्सून मुंबई-पुण्यात पोहोचल्याची घोषणा झालेली नाही. कारण, मान्सून आल्याचे जाहीर करण्याचे काही निकष असतात. त्यानुसार, गेल्या 24 तासात झालेल्या पावसाच्या नोंदींचा आधार घ्यावा लागतो. ठराविक काळ, ठराविक पाऊस झाल्यानंतरच “आयएमडी” कडून त्या भागात मान्सून आल्याची अधिकृत घोषणा केली जाते. साधारणतः मान्सूनच्या आगमनाची अधिकृत घोषणा दमदार पावसानंतर दुसऱ्या दिवशी केली जाते. त्यामुळे, मुंबई-पुण्यात मान्सूनचे आगमन झाल्याची अधिकृत घोषणा आज, रविवारी जाहीर केली जाऊ शकते, असा काही हवामानतज्ञांचा दावा आहे. यापूर्वी केलेली घाई आणि त्यावर होणारी चौफेर टीका लक्षात घेऊन हवामान खात्याने अधिकृत घोषणेबाबात सबुरीचा मार्ग धरलेला दिसतोय.
सध्या तरी मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणपर्यंत सर्वत्र मान्सूनची लक्षणे दिसत आहेत. उत्तर आणि दक्षिण कोकणमध्ये येत्या पाचही दिवसात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. विशेषत: कोकणाच्या उत्तर भागात पावसाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.
रविवारी बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रवास आता येत्या काही दिवसात मध्य भारताकडे होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या प्रभावाने पुढील चार दिवसात विदर्भात सर्वत्र पाऊस बरसणार आहे. तर, 26 ते 27 जून या कालावधीत मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस होण्याचे अनुमान आहे. किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकणात पुढील पाच दिवस सर्वदूर पावसासह काही ठिकाणी मुसळधार सरींचीही शक्यता असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.
मुंबईत ऑरेंज अलर्ट, रायगड-रत्नागिरीलाही इशारा
मान्सूनने नव्याने जोर धरल्यानंतर काल पहिल्याच दिवशी मुंबईत दमदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी 200 मिमीचा टप्पा गाठला गेला. रविवारी मुंबईसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड जिल्ह्यात येत्या चार आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या दोन दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिला आहे. कोकणातील बहुतांश भागासह मध्य महाराष्ट्रातील घाट भागात शनिवारी सकाळपासून संततधार पावसाची हजेरी होती. काही ठिकाणी तर मध्यम ते जोरदार पाऊस नोंदवला गेला. कोल्हापूर, सातारा, पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील घाट भागालगतच्या क्षेत्रातही काल दिवसभर चांगला पाऊस झाला. पालघर, औरंगाबाद आणि वाशीम जिल्ह्यातही काल पावसाने दमदार हजेरी लावली. पुण्यात 135 मिमीहून अधिक पाऊस नोंदविला गेला. पिंपरी-चिंचवड परिसरातही चांगला पाऊस झाला. आता पावसाचा जोर वाढल्यास जूनमधील उरलेल्या काही दिवसातच महिन्याची सरासरी ओलांडली जाऊ शकते.
मान्सूनची प्रगती, पावसासाठी पोषक स्थिती – आयएमडी
बंगालच्या उपसागरात वायव्येकडील वातावरणात सध्या चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यापासून आज, रविवारपर्यंत या हंगामातील पहिले मान्सून मॉडेल कार्यान्वित होण्याचे म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अरबी समुद्रातही पश्चिम किनारपट्टीशी समांतर क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. अरबी समुद्रात गुजरातजवळ चक्रीय स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. या स्थितीच्या प्रभावाने मान्सूनच्या वाऱ्यांना जोर आला आहे. मान्सूनची प्रगती, पावसासाठी ही पोषक स्थिती असल्याचे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.