मुंबई – महाराष्ट्रात दहा तारखेपासून रंगलेला मान्सून पूर्व विदर्भाच्या दारापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, राज्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत असताना आता एक आनंदाची बातमी आली आहे. ती म्हणजे मान्सून पुढील तीन ते चार दिवसात पुन्हा सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. राज्यात काही ठिकाणी मात्र आजहीपावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. इथे विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
ठाणे, मुंबई, रत्नागिरी, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे, सातारा, या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक राज्ये उष्णतेच्या लाटेच्या तडाख्यात आहेत. दिल्ली आणि यूपीमध्ये उष्मा प्राणघातक बनला आहे. उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे.
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, दिल्लीतील वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, आज म्हणजेच 19 जून ते 22 जूनपर्यंत जोरदार वारे आणि मेघगर्जनेसह रिमझिम पावसाचा अंदाज आहे. ज्यामुळे दिल्लीतील लोकांना उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळू शकेल. मात्र 23 जूनपासून दिल्लीत पुन्हा उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे.