मुंबई : Monsoon 2023 Update अखेर मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तशी भारतीय हवामान खात्याची अधिकृत घोषणा झाली आहे. केरळात सात दिवसांच्या विलंबाने मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली आहे. आता मान्सून महाराष्ट्रात 13 जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी पावसाने भारताच्या मुख्य भूभागावर प्रवेश केला आहे. मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला, असे IMD ने 8 जून रोजी दुपारी घोषित केले. मान्सून आता पुढील 48 तासांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही भागाकडे म्हणजेच केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि ईशान्येकडील भागाकडे सरकणार आहे.
यंदा केरळमध्ये सरासरीपेक्षा सात दिवस उशिराने मान्सून दाखल झाला. नैऋत्य मान्सून साधारणपणे मेच्या मध्यात अंदमान निकोबार बेटांवर आणि 1 जून रोजी केरळमध्ये पोहोचतो. चक्रीवादळ बिपरजॉयच्या हालचाली केरळमध्ये मान्सूनच्या आगमनास मदत करतील, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, हे चक्रीवादळ मान्सूनचा प्रवास कमकुवत करेल.
संपूर्ण लक्षद्वीप आणि केरळ; तसेच दक्षिण तामिळनाडूच्या बहुतांश भागात प्रगती केल्यावर, मान्सून पुढील 2 दिवसांत उर्वरित केरळ, तामिळनाडूचा आणखी काही भाग, तसेच कर्नाटक आणि ईशान्येकडील काही भाग व्यापेल, अशी अपेक्षा आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ आता अरबी समुद्र ओलांडून ओमानच्या दिशेने पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. काही हवामानशास्त्रज्ञांच्या मते, चक्रीवादमुळे मान्सूनसाथीचा ओलावा कमी होऊ शकेल. त्यामुळे चक्रीवादळ पूर्ण विसर्जित होईपर्यंत मान्सून कमजोर राहू शकेल.
“स्कायमेट”चे अध्यक्ष जीपी शर्मा यांनी सांगितले, “चक्रीवादळाचे स्थान पाहता, 8-9 जूनच्या सुमारास मान्सून सुरू झाला तरी तो जोरदार असणार नाही. कारण हे चक्रीवादळ मान्सूनच्या प्रगती आणि आगेकूचसाठी हानिकारक ठरेल.”
आयएमडीने यापूर्वीच वर्तविलेक्या अंदाजानुसार, यावर्षी एल निनो परिस्थितीमुळे मध्य, पश्चिम आणि वायव्य भारतातील काही भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटिऑरॉलॉजीचे हवामान शास्त्रज्ञ रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी मे महिन्यातच मान्सून लांबण्याचा अंदाज वर्तविला होता. एल निनोमुळे मान्सूनला विलंब होतो, शिवाय मान्सून कमकुवत होतो, असे त्यांनी म्हटले होते. मान्सून सुरू होण्याच्या काळातच चक्रीवादळ विकसित होते, त्याचा विपरीत प्रभाव पडतो, असा इशाराही रॉक्सी कोल यांनी दिला होता.
एल निनो म्हणजेच एल निनो-सदर्न ऑसिलेशन (ENSO). या स्थितीमुळे, पॅसिफिकमधील सागरी प्रवाह आणि वाऱ्यांची दिशा आणि तीव्रता दर तीन ते सात वर्षांनी बदलते.