कमी पाणी, कमी मनुष्यबळ आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणजे फळबाग. त्यातही आत्माराम डोईफोडे यांनी मिश्रफळबागेचा प्रयोग करुन चांगले उत्पादन काढले आहे. शासकीय अनुदानाच्या मागे न लागता डोईफोडे यांनी लागवड केलेली ही मिश्रफळबाग अनेक शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.
पारंपरिक पिकापेक्षा फळबाग फायदेशीर ठरत आहे. शासनाचे कृषी खाते फळबाग लागवडीसाठी अनुदान देते. त्यामुळे असंख्य शेतकरी आता फळबाग लागवड करीत आहेत. बीड जिल्ह्यातील ईट येथील कृषी पदवीधारक शेतकरी आत्माराम सुंदरराव डोईफोडे यांनी पेरु,सिताफळ,जांभूळ,डाळिंब या मिश्र फळबागेची लागवड करुन मोठे उत्पन्न मिळविले आहे.
आत्माराम डोईफोडे यांनी कृषीपदवी संपादन करून नोकरीच्या मागे न लागता शेतीतच आपले करियर घडविले आहे. ईट हे साडेतीनहजार लोकसंख्येचं गाव. बीडपासून पूर्वेला 16 कि मी अंतरावर आहे. येथे डोईफोडे यांची एकूण 10 एकर मध्यम प्रतीची जमीन आहे.त्यात सिंचनासाठी एक विहीर आणि 4 बोअरवेल मात्र पाण्याचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. या पाण्याचा फळबागेला ठिबकसिंचन संचाद्वारे नियोजनबद्ध उपयोग केला जातो.
पेरुची लागवड
दोन वर्षापूर्वी पारंपरिक पिकांना फाटा देत 12 बाय 6 फूट अंतरावर अमृत रॉयल जातीच्या पेरुच्या 400 रोपांची लागवड केली. फक्त वर्षभरातच फळे यायला लागतात. फळांचा रंग हिरवट पिवळा, बिया कमी व गर अधिक असून फळ गोड लागते. फळे आकाराने मोठी असतात. एक फळ साधारणत: एक किलो वजनाचे असते. योग्य व्यवस्थापन ठेवल्यास दोन वर्षे वयाच्या एका झाडापासून 25-30 किलो फळे मिळतात. यासोबतच त्यांनी अलहाबाद सफेदा वाणाच्या 100 पेरुंचीही लागवड केली आहे. या च्या जातीच्या फळाचा आकार लहान असून गोडी चांगली असते. याही झाडाला फळे लवकर येतात. या दोन्ही जातीच्या उत्पादन पेरूची एक एकर क्षेत्रावर लागवड केली आहे.
जांभूळ लागवड
पेरुसोबत त्यांनी 6 वर्षापूर्वी कोकण बडोली वाणाच्या जांभळाची 100 रोपे 24 बाय 24 फूट अंतरावर लागवड केली आहे. जांभळाला लागवडीपासून तिसर्या वर्षी फळधारणा होते. याच्या फळांचा रंग गडद जांभळा व फळे मधुर असतात. फळातील बी बारीक व गर अधिक असतो. तोडणीनंतर फळे अधिक काळ टिकून राहत असल्याने निर्यातक्षम आहेत. फळे आकाराने मोठी म्हणजे 25 ते 40 ग्रामचे एक फळ असते. सहा वर्षाची झाडे भरपूर उत्पादन देतात. तसेच जांभळाचे साई वाणाचीही लागवड आहे. त्याचे वजन साधारणत: 50 ग्राम भरते. लागवडीनंतर तिसर्या वर्षी फळे येऊ लागतात. पेरु,जांभळासह सुपर गोल्डन सिताफळाची 14 बाय 7 फूट अंतरावर 600 झाडे लावली आहेत.
बागेचे संगोपन
बागेतील सर्वच फळझाडांना दरवर्षी शेणखत दिले जाते. सिताफळावर बुरशी व मिलीबग रोग येवू नये म्हणून दशपर्णी अर्क आणि निंबोळी अर्काची फवारणी करावी लागते. झाडांना ताण दिल्यांनंतर ठीबकने पाणी दिले जाते. उन्हाळ्यात खालच्या फांद्यांची कापणी करावी लागते. सिताफळाच्या फळधारणेकरीता मे महिन्याच्या शेवटी सर्व कोवळ्या फांद्या छाटल्याने पाऊस पडताच नवी पालवी फुटून फूलधारणा होते. त्यासाठी बागेला मे महिन्यापासून पाणी देणे बंद करुन फुलाधारणेसाठी ताण दिला जातो.
उत्पादन व विक्री
सिताफळाचे 13 टन उत्पादन मिळाले असून पहिल्या वर्षी 2 टन फळांना प्रती किलो सरासरी 75 रु दर मिळाला. त्यापासून दीडलाख रुपये उत्पन्न मिळाले होते. 25 हजार उत्पादन खर्च वजा जाता 1 लाख 25 हजार रुपये निव्वळ उत्पन्न मिळाले. दुस-या वर्षी 5 टन उत्पादनातून उत्पादन खर्च 30 हजार खर्च वजा जाता 3 लाख 45 हजार रुपये उत्पन्न आले. तिस-या वर्षी 6 टन उत्पादनातून साडेसात लाख रुपये उत्पन्न आले. अशा प्रकारे 3 वर्षात सुमारे 12 लाख रुपये इतके उत्पन्न आले. जांभळाचे दोन वर्षापासून 8 क्विंट्टल उत्पादन झाले आहे. प्रती किलो 120 रु स्थानीक बाजारात दर मिळत आहे. जांभूळ विक्रीतून दिडलाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. पेरुचे 8 टन उत्पादन आले आहे. त्यातून खर्च वजाजाता 2 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
रोपवाटीकेची निर्मिती
डोईफोडे यांनी 2 वर्षापूर्वी आपल्या शेतातीलाच पेरु, सिताफळ, जांभूळ, लिंब, डाळींब, ड्रॅगनच्या मातृवृक्षापासून रोपवाटीका तयार केली आहे. ते दरवर्षी सिताफळ 50 हजार, पेरु 50 हजार, जांभूळ 5 हजार, कागदी लिंबू 15 हजार, साई सरबती 15 हजार रोपांची विक्री होते.
शेतक-यांनी पारंपरिक पिकाला फाटा देऊन आधुनिक पध्दतीने पिकांची निवड करणे काळाची गरज आहे. शेतकर्यांनी आपल्या एकूण क्षेत्रापैकी दोन एकर क्षेत्रावर फळबाग लावली तर चांगले उत्पन्न मिळते. कमी पाण्यात, कमी खर्चात फळबाग अधिक उत्पन्न मिळवून देते याचा मी अनुभव घेत आहे.
आत्माराम सुंदरराव डोईफोडे
ईट (पिंपळनेर) ता. जि. बीड.
मो.9545875151.