‘स्कायमेट’ या खासगी हवामान संस्थेने जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आगामी 15 दिवसात महाराष्ट्र कोरडाच राहण्याची शक्यता आहे. या काळात देशाच्या पश्चिम किनारपट्टी अन् ईशान्य भागाकडेच चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळानंतर, एल निनो स्थितीमुळे ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
या बातमीत असलेला येत्या 15 दिवसातील पावसाच्या आगेकूच, प्रगतीचा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहा. त्यात उजव्या वरच्या कोपऱ्यात तारीख बदलते. त्या-त्या तारखेला देशात पाऊस कसा असू शकतो, ते पाहा. ‘स्कायमेट’चे हेड वेदरमन जतीन सिंग यांनी अत्याधुनिक हवामान तंत्राने वर्तविलेला 12 ते 27 जून या 15 दिवसांचा देशातील पावसाचा हा अंदाज आहे.
या व्हिडिओत जो हिरवा भाग आहे तो कमी पावसाचा म्हणजे जिथे 10 मिलिमीटर पर्यंत पाऊस होण्याचा अंदाज आहे. पिवळा भाग हा 10 ते 20 मिलिमीटर पावसाचा, गडद पिवळा भागात 20 ते 30 मिलिमीटर आणि पुढे केसरी भाग हा चांगल्या पावसाचा (20 ते 70 मिमी) आहे. तांबड्या-लालसर भागात 70 ते 160 मिमी मुसळधार पाऊस पडू शकतो. पुढे निळा-गडद निळा हा भाग अतिपर्जन्यवृष्टी, ढगफुटीच्या 180 ते 250 मिमी पावसाचा आहे.
‘स्कायमेट’चा हा 15 दिवसांचा पावसाचा अंदाज पाहता, चक्रीवादळानंतर समुद्रात एक कमकुवत स्थिती निर्माण झालेली दिसते. त्यामुळे आगामी 15 दिवसात बहुतेक पाऊस हा पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्येकडे पडेल, अशी चिन्हे दिसत आहेत. भारताचा संपूर्ण मधला पट्टा अतिशय कमी पावसाचा राहून देशाच्या अवती-भोवतीच पावसाचा पट्टा फिरताना या 15 दिवसाच्या अंदाजात दिसते.
एल निनो वेगाने विकसित होत असताना त्याचे असे परिणाम दिसू शकतात. जतीन सिंग यांच्या मते, नव्याने विकसित होणारा एल निनो हा उत्क्रांत झालेल्या एल निनोपेक्षा मान्सून स्थितीसाठी कितीतरी जास्त धोकादायक असू शकतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇