मुंबई : Kisan Credit Card… भारत हा कृषीप्रधान देश असून शेतकरी पशुपालन देखील करतात. शेतकरी आणि बिगर शेतकऱ्यांना पशुसंवर्धनासाठी केंद्र आणि राज्य सरकार प्रोत्साहन देत असून शेतकरी, पशुपालकांच्या हितासाठी अनेक पावले देखील उचलत आहे. तसेच पशुपालनासाठी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येत आहे.
किसान क्रेडिट कार्डची सुविधा केंद्र सरकार पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना देत आहे. या अंतर्गत देशव्यापी AHDF KCC मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कार्डच्या मदतीने 4 टक्के व्याजाने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकरी घेऊ शकतात. केंद्र सरकारने आतापर्यंत 27 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. तर केंद्र सरकारने नवीन मोहीम सुरू केली आहे.
नव्या मोहिमेची ब्लू प्रिंट केंद्र सरकारने तयार केली आहे. पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, वित्तीय सेवा विभाग दुग्धव्यवसाय, पशुपालन आणि मत्स्यपालकांना क्रेडिट कार्डचा लाभ देण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीमची सुरुवात 1 मे 2023 पासून सुरू झाली असून 31 मार्च 2024 पर्यंत चालणार आहे. याला देशव्यापी AHDF KCC मोहीम असे नाव देण्यात आले असून यासाठी बँक व इतर विभागांना सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
Kisan Credit Card चे फायदे
एक शेतकरी वार्षिक 4 टक्के व्याजदराने 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतो. 1.60 लाखांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही तारण द्यावे लागणार नाही. कार्डधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा कायमचे अपंगत्व आल्यास, 50,000 रुपयांपर्यंतचे कव्हर उपलब्ध आहे. दुसऱ्या जोखमीच्या बाबतीत, 25,000 रुपयांपर्यंतचे संरक्षण दिले जाते. क्रेडिट कार्डसोबत बचत खातेही उघडले जाते. पीक घेतल्यानंतर शेतकरी कर्जाची परतफेड करू शकतात.
येथे करा अर्ज
किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज अतिशय सोपा आहे. तुम्हाला जर या मोहिमेचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेच्या शाखेत जा आणि पशु किसान क्रेडिट कार्ड अर्जाची मागणी करा. त्यात विनंती केलेली माहिती भरा. आवश्यक कागदपत्रे संलग्न करा आणि सबमिट करा. बँक अधिकारी फॉर्म तपासतील. अर्जात दिलेली माहिती बरोबर असल्यास महिन्याभरात तुम्हाला प्राणी क्रेडिट कार्ड मिळेल.