ठिबक सिंचन संचाची देखभाल
खोडवा ऊस : ठिबक सिंचनाची सोय असल्यास, ठिबक सिंचन संचातून ऊसासाठी पाण्याबरोबर शिफारशीत खत मात्रेच्या 80 टक्के विद्राव्य खते (80:40:40 नत्र, स्फुरद, पालाश किलो/ एकर) खोडवा ठेवल्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा याप्रमाणे द्यावे. ते सलग 26 हप्त्यांत दिल्याने ऊस उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ होऊन खतांच्या मात्रेत 20 टक्के बचत होते.
खोडवा पिकासाठी ठिबक सिंचनातून देण्यासाठी विद्राव्य खतांचे वेळापत्रक (किलो/ एकर/ हप्ता) :
आठवडे – युरिया – 12:61:00 – एम.ओ.पी.
1 ते 4 आठवडे – 06 – 02 – 1.5
5 ते 9 आठवडे – 10 – 06 – 02
10 ते 20 आठवडे – 6.5 – 4.5 – 02
21 ते 26 आठवडे – 00 – 00 – 04
सुरु ऊस :
ठिबक सिंचन संचाची देखभाल – बरेच शेतकरी ठिबक सिंचन संचाची देखभाल वेळेवर व योग्य प्रकारे करत नसल्याने ठिबक सिंचनातील ड्रीपर बंद होऊन सर्व ठिकाणी शेतात एकसमान पाणी व अन्नद्रव्ये उपलब्ध न झाल्याने पिकाचे उत्पादन घटते.
तांत्रिकदृष्ट्या योग्य बाबी ठिबक सिंचन संच कायमस्वरूपी योग्य दाबावर कार्यक्षमरीत्या चालण्यासाठी खालील देखभाल वेळेवर करावी.
- मीडिया फिल्टर, स्क्रीन फिल्टर/ डिस्क फिल्टर दररोज साफ करावा.
- ठिबक सिंचन 1.5 किलोग्रॅम प्रति सें.मी. वर्ग दाबावर चालवावा. लॅटरलच्या शेवटच्या ड्रीपरवर १ किलोग्रॅम प्रति सें.मी. वर्ग एवढा दाब असणे जरुरीचे आहे.
- आठवड्यातून एकदा सबमेनवरील फ्लॅश व्हॉल्व्ह खोलून सबमेन साफ करावी.
- आठवड्यातून एकदा लॅटरल शेवटच्या तोंडाचे एन्ड कॅप काढून नेहमीपेक्षा दीडपट ते दुप्पट दाबाच्या पाण्याने फ्लश कराव्यात.
- सहा महिन्यांनी बंद पडलेल्या तोट्या एक टक्का आम्लाच्या पाण्याने साफ कराव्यात.
- जैविक कारणाने तोट्या बंद पडल्या असतील, तर सहा महिन्यांतून एकदा क्लोरिनची प्रक्रिया करावी.
- लॅटरलमध्ये शेवाळाची वाढ होत असेल तर मोरचुदाची प्रक्रिया करावी.
- पाण्यामध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास आम्ल प्रक्रिया करणे जरुरीचे असते. आम्ल उपचारासाठी सल्फ्युरिक ॲसिड (65%), हायड्रोक्लोरिक ॲसिड (35%), नायट्रिक ॲसिड (85%), फॉस्फरिक ॲसिड (85%) यापैकी एका आम्लाचा वापर करावा. जर पाण्यात लोहाचे प्रमाण 0.5 पीपीएमपेक्षा जास्त असेल, तर फॉस्फरिक ॲसिडचा वापर टाळावा.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)
Comments 2