देशात 13 ऑक्टोबरच्या आसपास सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्स दिसण्याची अपेक्षा आहे. याशिवाय किनारपट्टीलगत मान्सून ट्रफ आणि विस्कळीत अभिसरण या दोन्ही प्रणाली दिसत आहेत. परिणामी, देशात अनेक ठिकाणी पुढील काही दिवस पाऊस सुरू राहू शकतो. या हवामान स्थितीमुळे महाराष्ट्रातही रविवारी, सोमवारी म्हणजेच 15 व 16 ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आश्चर्य म्हणजे ‘आयएमडी’ची राज्यातून मान्सून परतल्याच्या घोषणेची घाई झालीं ‘स्कायमेट’च्या अनुमानानुसार मात्र आणखी काही दिवस पाऊस सुरू राहणार आहे. दुसरीकडे, देशातील मान्सून माघारीची प्रक्रियाही लांबणार आहे. उत्तरेकडील प्रदेशात येत्या काही दिवसात मुसळधार पाऊस आणि हिमवर्षाव होण्याचे अनुमान आहे. देशाच्या दोन्ही किनारपट्टी आणि दक्षिणेकडील भागातही आणखी काही दिवस पावसाचे राहू शकतील, असे ‘स्कायमेट’ने म्हटले आहे.
उकाडा कमी, किमान तापमानात घट
हवामानात निर्माण झालेल्या पश्चिमी भौगोलिक घडामोडींमुळे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) सध्या देशात अनेक ठिकाणी उकाडा कमी झाला आहे. अनेक शहरात किमान तापमान खालावले आहे. आगामी वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर भारतातील मैदानी भागात जोरदार पाऊस पडेल. दिल्लीतही किमान तापमानात घट होत असून, पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
येत्या रविवारी, सोमवारी मुंबई परिसरात पावसाची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तविली आहे. काही प्रमाणात हलका ते मध्यम स्वरूपाचा असा हा पाऊस असू शकेल. खरेतर, राज्यातून मान्सून परतल्याची अधिकृत घोषणा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) केली आहे. सहसा, नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम आटोपल्यानंतर लगोलग राज्यात त्यातल्या त्यात मुंबईत पाऊस पडत नाही. किनारपट्टी भागात किंवा अरबी समुद्रात नवी मान्सून प्रणाली निर्माण झाली तरच रिटर्न मान्सूननंतर लगोलग पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.
पश्चिम किनार् याजवळील मान्सून ट्रफमुळे मुंबईत पाऊस
यंदा असाच काहीसा प्रकार घडताना दिसत आहे. त्यामुळे 15 आणि 16 ऑक्टोबरच्या सुमारास मुंबई परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम किनार्याजवळ तयार होत असलेला मान्सून ट्रफ कोकण प्रदेशापर्यंत पसरलेला दिसत आहे. रिटर्न मान्सून घोषणेनंतर मुंबई परिसरात पावसाची शक्यता ही एक असामान्य घटना असल्याचे सांगितले जात आहे. कारण, मान्सून शहरातून निघून गेल्यानंतर सहसा लगेच मुंबईत पाऊस पडत नाही. यापूर्वी, 2015 मध्ये अशी परिस्थिती उद्भवल्याचे हवामान अभ्यासक सांगतात.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇
- पावसावर इंडियन निनोचा प्रभाव, पुढील महिन्यात पुन्हा पावसाची शक्यता
- विदर्भ-मराठवाड्यात “स्मार्ट कृषी”साठी जिल्हानिहाय टार्गेट मर्यादा काढली; आता सर्व एफपीसीना मिळणार कर्ज