पुणे : रेबीज हा आजार जीवघेणा असला तरी तो प्राण्यांचे व मनुष्यांचे वेळापत्रकानुसार लसीकरण करण्याची काळजी घेतल्यास निश्चितपणे टाळता येऊ शकतो, असे पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितले. तसेच वन हेल्थ अंतर्गत इतर विभागांच्या समन्वयाने पशुसंवर्धन विभागाने रेबीज निर्मुलनामध्ये पुढाकार घेऊन या विषयाकडे अत्यंत संवेदनशिलतेने पाहणे गरजेचे आहे. 2030 पर्यंत कुत्र्यांमार्फत प्रसारीत होणाऱ्या रेबीजचे निर्मुलनाचे उद्दिष्ट असल्याचे देखील पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले.
पशुसंवर्धन आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, औंध, पुणे येथे रेबीज रोग निदानविषयक एक दिवशीय संमेलन नुकतेच पार पडले. वाढत्या शहरीकरणामुळे जंगली श्वापदे आणि मोकाट श्वान यांच्यात वेळोवेळी संघर्ष होतो व मोकाट श्वान रेबीजला बळी पडतात. महाराष्ट्र राज्यात सन 2019 च्या पशुगणनेनुसार सुमारे 12.76 लक्ष मोकाट श्वान व 9.35 लक्ष पाळीव श्वान आहेत. त्यापैकी 70% श्वानांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून, हे लसीकरण पूर्ण झाल्यानंतर रेबीजचा प्रसार थांबण्यास मदत होणार आहे. तसेच वन हेल्थ अंतर्गत रेबीज रोगाचे निर्मुलन 2030 पर्यंत करण्याचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका व वन विभाग अशा अनेक विभागांच्या समन्वयाने काम करणे काळाची गरज आहे.
यावेळी तुकाराम मुंढे, सचिव, (पशुसंवर्धन व दुग्धविकास) महाराष्ट्र शासन यांच्या वैचारिक प्रेरणेतून राज्यातील पशुसंवर्धन विभागातील सर्व जिल्ह्यातील रोगनिदान व पशुउपचार करणारे अधिकारी, रोग अन्वेषण विभाग, पुणे व पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्था, पुणे येथील अधिकारी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथील अधिकारी अशा एकूण 75 अधिकाऱ्यांना श्वानदंशाविषयी, श्वान चावल्यानंतर घ्यावयाची काळजी, औषधोपचार, लसीकरण, नमुने संकलन, नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्याची शास्त्रोक्त पद्धत याविषयी प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले गेले.
या वेळी बोलताना पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले की, रेबीज “हा आजार जीवघेणा असला तरी तो प्राण्यांचे व मनुष्यांचे वेळापत्रकानुसार लसीकरण करण्याची काळजी घेतल्यास निश्चितपणे टाळता येऊ शकतो. मनुष्यामध्ये होणारा रेबीज हा 96% कुत्र्यांच्या चाव्यामुळे होतो. जगामध्ये दरवर्षी सुमारे 60,000 मृत्यू रेबीजमुळे होतात आणि यापैकी 90% मूत्यू आशिया व आफ्रिका खंडात होतात. या मृत्यूमध्ये 9 ते 15 वर्षातील वयातील मुलांचा जास्त समावेश असतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये रेबीजमुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण जास्त आहे. वन हेल्थ अंतर्गत इतर विभागांच्या समन्वयाने पशुसंवर्धन विभागाने रेबीज निर्मुलनामध्ये पुढाकार घेऊन या विषयाकडे अत्यंत संवेदनशिलतेने पहाणे अत्यंत गरजेचे आहे. 2030 पर्यंत कुत्र्यांमार्फत प्रसारीत होणाऱ्या रेबीजचे निर्मुलनाचे उद्दिष्ट” आहे.
श्वानांच्या वागणुकीमध्ये होणारा बदल ओळखणे – डॉ. अजित शेवाळे
श्वानदंश झाल्यानंतर चोवीस तासात उपचार सुरु होणे गरजेचे आहे. चावा किती तीव्रतेचा आणि कोणत्या जागेवर झाला आहे. त्यानुसार उपचार कोणता द्यायचा हे निश्चित केले जाते. श्वानाच्या चाव्यानंतर जखम 15 मिनिटे पाणी व साबनाने धुणे हे फार महत्त्वाचे असून त्यामुळे शरीरातील विषाणूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. श्वानदंश होऊ नये म्हणून श्वानांच्या वागणुकीमध्ये होणारा बदल ओळखणे, चावा होऊ नये म्हणून घ्यावयाची दक्षता याबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. याकरीता USAID, PSI, PATH व इतर NGO यांचेमार्फत व्यापक उपाययोजना केली जात आहे. असे डॉ. अजित शेवाळे उपसंचालक, वन हेल्थ विभाग, एन.सी.डी.सी. यांनी त्यांच्या सादरीकरणामध्ये सांगितले.
डॉ. कविता जी. सहाय्यक प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय बंगळुर व डॉ. फरांदे, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांनी नमुने संकलन, नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्याची शास्त्रोक्त पद्धत याविषयी सादरीकरणकाद्वारे माहिती व प्रात्याक्षिकासह प्रशिक्षण दिले. तसेच पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय स्तरावर रेबीज रोग निदानासंबंधी कामकाज करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे विचार मांडले. डॉ. श्रीकृष्णा इस्लुर प्राध्यापक व संचालक रेबीज प्रयोगशाळा, बंगळुर व डेबालिना मित्रा, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग भारत सरकार यांनी दृकश्राव्य माध्यमाद्वारे (VC) प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित सर्व मान्यवरांनी रेबीज विषयक प्रशिक्षणार्थींच्या सर्व प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.
या संमेलनाला पशुसंवर्धन आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, पशुसंवर्धन सहआयुक्त प्रकाश अहिरराव, पशुसंवर्धन प्रादेशिक सहआयुक्त डॉ. संतोष पंचपोर, रोग अन्वेषण विभाग सहआयुक्त पशुसंवर्धन डॉ. याहयाखान पठाण, उपसंचालक एनसीडीसी डॉ. अजित शेवाळे, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. दिपक साळुंखे, सामुहिक स्वास्थ्य तज्ञ डॉ. टिकेश बिसेन, राज्यप्रमुख पाथ डॉ. सतीश ताजने, सहाय्यक प्राध्यापक डॉ. कविता जी., पशुवैद्यकीय महाविद्यालय डॉ. फरांदे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. याहयाखान पठाण, सहआयुक्त पशुसंवर्धन, रोग अन्वेषण विभाग, पुणे यांनी केले.