कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना आवाहन
यावर्षी झालेले पर्जन्यमान आणि अतिवृष्टी यामुळे रब्बीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे मका व इतर रब्बी पिकांच्या लागवडीत वाढ होण्याची शक्यता आहे. खरीपात मका पिकावर मोठ्या प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. आणि मका हेच या अळीचे मुख्य खाद्य असल्याने रब्बी मधील मकावर या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अलीकडेच गुजरातमध्ये या अळीचे कापूस पिकावर अस्तित्व दिसून आले त्यामुळे रब्बीच्या हंगामात हि अळी इतर पिकावर प्रादुर्भाव होण्याची शक्यता लक्षात घेता हा धोका टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
कापूस व इतर पिकावर नवीन लष्करी अळीचा प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने या किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीची शिफारस केली असून, एकात्मिक कीड व्यवस्थानाबाबत शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये नियमितपणे निरीक्षण आणि देखरेख करून एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धतीचा अवलंब करावा कपाशीची प्रादुर्भावग्रस्त फुले व हिरवी बोंडे त्वरित वेचून अळ्यासहित नष्ट करावीत. जेणेकरून अळीचा होणारा प्रसार रोखण्यास मदत होईल.
एकात्मिक कीड व रोग नियंत्रण पद्धत म्हणजे काय ?
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत राहणे व त्यानुसार कीड नियंत्रणाचे विविध उपाय योजले तर अनावश्यक फवारण्या व त्यावरील खर्चात बचत होते. किडींची संख्या ठराविक मर्यादेत असतानाच कीडनाशकाचा वापर झाल्यास फवारण्याची संख्या कमी करता येते.
त्यांचे अंश कमी होतात. पर्यावरणीय हानी कमी होते. मजुरी खर्चात बचत होते. हवामान बदलामुळे किडींची संख्या वाढू लागली आहे म्हणून एकात्मिक कीड नियंत्रणाचे उपाय अंमलात आणण्याची गरज वाढली आहे.