मुंबई : उन्हाळा की पावसाळा ?, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना पडू लागला आहे. मे महिन्यात सर्वाधिक उकाळा जाणवायचा. पण, यंदाच्या मे महिन्यात अवकाळी पावसाने दमदार एंट्री मारलेली आहे. त्यामुळे कधी पाऊस तर कधी कडक ऊन अशी स्थिती आहे. अशातच IMD ने जळगाव, नाशिकसह काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच पुढील 15 ते 20 दिवस महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे सावट असणार असल्याची माहिती ज्येष्ठ सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

आज या जिल्ह्यांना यलो अलर्ट
आज दि. 13 मे रोजी जळगाव, धुळे, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली, पालघर, ठाणे, उपमुंबई, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने (IMD) यलो अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
आज या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
आज दि. 13 मे रोजी अहमदनगर, बीड, पुणे, सोलापूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच गोंदिया आणि नंदुरबार या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नाही.
महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट
मान्सून केरळमध्ये होईल तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आजपासून पुढील 15 ते 20 दिवस म्हणजेच 31 मे पर्यंत मान्सूनपूर्व अवकाळी पावसाचे सावट असणार आहे. दरम्यान, केरळात मान्सून कधीही दाखल होऊ शकतो. तसेच 23 ते 31 मे दरम्यान मान्सून दाखल होणार असलयाचे माणिकराव खुळे यांनी सांगितले.
सध्या अंदमान व आग्नेय बंगाच्या उपसागरात दाखल झालेला मान्सून चांगलाच कोसळत आहे. त्याच्या पुढील वाटचालीस वातावरण अनुकूल तयार होत आहे. यातूनच कदाचित महाराष्ट्रात पेरणीपूर्व शेतीची मशागत करण्याची संधी शेतकऱ्यांना मिळू शकते. तसेच याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवून आवश्यक असलेल्या खरीप पेरणीपूर्व मशागतीची तयारी करण्यास हरकत नाही, असे वाटते, असे देखील माणिकराव खुळे म्हणाले. टोमॅटो लागवड करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी याची नोंद घ्यावी. परंतु, शेतकऱ्याने स्वतः हा निर्णय घ्यावा.