मान्सून प्रणाली अजून मजबूत – आयएमडी, जाणून घ्या कोणत्या जिल्ह्यात आहेत विशेष अलर्ट
हवामान विभागाने आधीच वर्तविलेल्या अंदाजानुसार,गेले 4-5 दिवस राज्यात समाधानकारक पाऊस बरसत आहे. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. आज कोकणासह राज्यातील सहा जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही दिवस घाट परिसरातही मुसळधार राहील.
ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाण्याअभावी पीके माना टाकू लागली होती. मात्र, पावसाने सप्टेंबरमध्ये राज्याच्या विविध भागात हजेरी लावून पिकांना जीवदान दिले. मुंबई-ठाण्यासह, पालघर, पुणे, नाशिक, नंदुरबार, वाशिम जिल्ह्यात गेल्या चांगला पाऊस होत आहे. पावसाचा हा जोर पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र कायम राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर काहीशी विश्रांती घेऊन 14 सप्टेंबरनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढून 17 सप्टेंबरपर्यंत कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसाचा रब्बी हंगामासाठी फायदा होणार आहे.
गोदावरी वाहू लागली, दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी : नाशिकमध्ये गंगापूर धरणातून यंदा प्रथमच विसर्ग झाला. गोदावरी वाहू लागली. दुतोंड्या मारुतीच्या पायाला पाणी लागल्याने नाशिककर सुखावले आहेत. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच पश्चिम व मध्य महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस झाला. नाशिक, पुण्यासह राज्यातील बहुतांश धरणात आता पाणीसाठा वाढला आहे. आता मात्र महाराष्ट्रातील पावसाचा जोर कोकणात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सूनची नवी प्रणाली तयार झाल्यानंतरच विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पुन्हा चांगल्या पावसाचे दिवस येऊ शकतात.
महाराष्ट्रात मान्सूनला जोमदार बनवणारी यंत्रणा कार्यरत
पुणे वेधशाळेचे हवामान शास्त्रज्ञ अनुपम कश्यपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल, शुक्रवारी दिवसभरात (संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत) हर्णे, महाबळेश्वर, सांताक्रूझ, माथेरान, नाशिक, अलिबाग, कुलाबा इथे चांगला पाऊस झाला. मान्सूनचे हे पुनरुज्जीवन आवश्यक होते. बंगालच्या उपसागरा तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा अनुकूल परिणाम अरबी समुद्रातही जाणवत आहे. चक्रीवादळ (UAC), कमी दाबाची रेषा आणि पश्चिमेकडील जोरदार वारे अशी महाराष्ट्रात मान्सूनला जोमदार बनवणारी यंत्रणा अजूनही कार्यरत आहे, असे कश्यपी यांनी म्हटले आहे. सध्या सिंधुदुर्ग वगळता कोकणातील सर्व जिल्हे तसेच नाशिक, पुणे आणि सातारा येथील घाट भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील गेल्या 24 तासातील “मोठा” पाऊस
हर्णे बंदर (रत्नागिरी) – 120 मिलिमीटर
महाबळेश्वर – 80 मिमी
माथेरान & सांताक्रूझ (मुंबई) – 70
ठाणे & नाशिक – 60
अलिबाग & कुलाबा (मुंबई) – 50
रत्नागिरी & चिखलदरा – 30
डहाणू & चिंचवड (पुणे) – 20
जळगाव & पुणे शहर – 10
पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरीत मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, शनिवारी राज्यातील सहा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. पालघर, ठाणे, पुणे, नाशिक, सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट आहे. या जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. राज्यातील उर्वरीत भागातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. लातूर, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांसाठी आज पावसाचा कोणताही विशेष अलर्ट नाही. तरीही या जिल्ह्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील दोन दिवस महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. पालघर जिल्ह्यासाठी शनिवारी (9 सप्टेंबर) आणि रविवारी (10 सप्टेंबर) अनुक्रमे यलो आणि ग्रीन अलर्ट जारी केला. शनिवारी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
रविवारी पालघर जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट आहे. उर्वरित जिल्ह्यांसाठी, काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या अंदाजासह यलो अलर्ट आहे. मुंबईसाठी 9 ते 12 सप्टेंबर दरम्यान हलक्या ते मध्यम पावसाच्या अंदाजासह ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे 11 आणि 12 सप्टेंबर रोजी ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.