मुंबई : IMD Monsoon Update भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) अनुमानानुसार, आजचा पाऊस (23 जून, शुक्रवार) विदर्भात काही ठिकाणी मुसळधार बरसणार आहे. मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्रासह मध्य महाराष्ट्रात व उर्वरित महाराष्ट्रात मात्र बहुतांश हलक्या स्वरूपाचा पाऊस राहू शकतो. काही तुरळक ठिकाणी मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आजही कोरडा राहण्याची शक्यता दिसत आहे. आज सकाळी 12 वाजेचे उपग्रह निरिक्षण अभ्यासले असता, विदर्भाचा काही भाग वगळता महाराष्ट्राचे आभाळ मोकळेच आहे. महाराष्ट्रावर अजूनही ढगांची गर्दी नसल्याने तुरळक ठिकाणी हलका पाऊस वगळता आजचा दिवसही बहुतांश महाराष्ट्रासाठी निराशाजनकच राहण्याची शक्यता आहे.
एकीकडे महाराष्ट्र कोरडा असताना, देशातील 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. सध्या देशातील काही भागात मान्सून दाखल झाला आहे, तर अनेक राज्ये अद्याप पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
टोळंबीचे तेल…! ऐकले आहे का..?… पहा हा खास व्हिडीओ
https://youtu.be/fyG9PJEeu1o
आज शुक्रवार, 23 जून म्हणजे जून महिन्याच्या चौथ्या आठवड्याचा दुसरा दिवस. देशाच्या अनेक भागात अजूनही उन्हाचा चटका कायम असून, अनेक भागात पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. लांबलेल्या मान्सूननंतर आता देशातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. काही ठिकाणी हलक्या-मध्यम पावसामुळे तापमानात घसरण होत असून वातावरण आल्हाददायक झाले आहे.
आजच्या दिवसाच्या आता दुपारी 12 वाजताच्या उपग्रह छायाचित्रांचे अवलोकन केले असता विदर्भाचा काही भाग वगळता बहुतांश महाराष्ट्राच्या आभाळावर पावसासाठी आवश्यक असलेल्या काळ्या ढगांची गर्दी दिसत नाही. तुरळक ठिकाणी विरळ ढग दिसतात. महाराष्ट्राच्या खालून व विदर्भाकडील बाजूने नकाशात ढगांची मोठी गर्दी दिसू शकते. गोवा, कर्नाटक आणि तेलंगणाकडून आता हे पावसाचे ढग महाराष्ट्रात शिरण्याची प्रतीक्षा आहे. त्यानंतर पावसाचा जोर वाढून कोंकण, मुंबई, मराठवाड्यातून मध्य व उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पावसाला सुरुवात होऊ शकेल.
“आयएमडी”चे पावसाचे ग्राफिक पाहिल्यावर देशातील पावसाची आजची स्थिती लक्षात येऊ शकेल. त्यानुसार, महाराष्ट्र पूर्ण कोरडा आहे. आकाशात ढगच नाहीत. कर्नाटक व मध्य प्रदेशात काहीसे ढग दिसतात. तटवर्ती गुजरात आणि तेलंगणावर काळ्या मेघांची माया दिसते.
देशातील मान्सूनच्या प्रगतीचा नकाशाही अत्यंत निराशाजनक आहे. 15 जून रोजी मान्सून महाराष्ट्र ओलांडून गुजरात व मध्य प्रदेशात दाखल व्हायला हवा होता. (नकाशात लाल रेषा – अपेक्षित वाटचाल) प्रत्यक्षात गेले 12 दिवस मान्सून तळकोकणातच अडकून पडलेला आहे. (नकाशात निळी रेषा – सद्य स्थिती) तो वर सरकायचे नावच घेत नाही. 30 जूनपर्यंत काश्मीरसह संपूर्ण भारत मान्सूनच्या ओलाव्याखाली यायला हवा होता. मात्र, 23 जून उजाडला तरी काहीसा दक्षिण भारत सोडला तर संपूर्ण देश मान्सूनच्या प्रतीक्षेत कासावीस आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
IMD बुलेटिननुसार, मान्सून द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये आणि पूर्व भारताच्या काही भागात पुढे सरकला आहे. आतापर्यंत केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशचा काही भाग, कर्नाटक, बंगालसह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडत असून मान्सून वेगाने पुढे जात आहे. मात्र, हा मान्सून अजून महाराष्ट्र, बहुतांश मध्य प्रदेश, गुजरातकडे फिरकलेला नाही. आयएमडीच्या अंदाजानुसार, आता पुढील 2 ते 3 दिवसात मान्सून दक्षिण भारतातून मध्य भारतात सरकू शकतो. याशिवाय, मान्सून आता उत्तरेकडेही सरकत असून 29 जूनपर्यंत दिल्लीत पोहोचू शकतो. दिल्लीमध्ये आजही हलक्या पावसाची शक्यता आहे.
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
आजपासून पुढील तीन दिवस जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेशसह अनेक भागात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुसरीकडे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशच्या अनेक भागात आज पावसाची शक्यता आहे. आज मध्य प्रदेश, झारखंड, पूर्व राजस्थान, किनारी आंध्र प्रदेश, रायलसीमा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, केरळच्या अनेक भागात जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील काही भागालाही आज हा तडाखा बसू शकतो. उत्तर प्रदेशात 25 जूनपासून पावसाचा जोर वाढून अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच 24 ते 25 जून या कालावधीत विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशातही धुवांधार राहू शकते.
स्कायमेट वेदर या खाजगी हवामान अंदाज संस्थेच्या अंदाजानुसार, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली, पूर्व राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, सिक्कीम, देशाच्या उत्तर-पूर्व भागात आज जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच, कर्नाटक, तेलंगणा, रायलसीमा, तामिळनाडू, कोकण, गोवा, केरळ आणि लक्षद्वीपसह अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही आज हलका ते मध्यमच पाऊस पडण्याची शक्यता आहे.