मुंबई : पाऊस आजपासून 4-5 दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्रातही बरसणार असल्याचे हवामान खात्याचे (IMD) अनुमान आहे. Monsoon Alert पाहता, कोकण, मुंबईत धुवांधार कायमच राहणार आहे. महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुडुचेरीतही मुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, मेघालय, आसाम, सिक्कीम, पश्चिम बंगाल तसेच उत्तर प्रदेशसह उप-हिमालयीन भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.
पीक विमा आता फक्त एक रुपयात ; असा करा अर्ज..
https://eagroworld.in/crop-insurance-now-only-for-one-rupee-apply-like-this/
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज-उद्या म्हणजेच 5 व 6 जुलै रोजी महाराष्ट्र आणि गोव्यात तर 7 जुलै रोजी गुजरातमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. 6 जुलै रोजी ओडिशात मुसळधार पावसाचे अनुमान आहे.
मध्य भारतात मान्सून सक्रीय राहणार – IMD Monsoon Alert GSF Rain Model
“आयएमडी”च्या GFS मॉडेल मार्गदर्शनानुसार, पुढील 4-5 दिवस संपूर्ण पश्चिम किनारा आणि दक्षिण द्वीपकल्पासह मध्य भारताच्या काही भागांमध्ये मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. मध्य-पूर्व आणि उत्तर-पूर्व भारतातील काही भागात देखील या काळात बहुप्रतिक्षित मान्सूनचा चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. वरील छायाचित्रातील जीएसएफ मॉडेलनुसार, पिवळ्या भागात दहा मिलिमीटरपर्यंत, हिरव्या भागात 10 ते 40 मिलिमीटरपर्यंत पाऊस होऊ शकतो. निळ्या भागात 40 ते 70, जांभळ्या भागात 70 ते 130 आणि केसरी-लाल भागात 130 मिलिमीटरहून अधिक पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस
पुणे वेधशाळेचे हवामान अंदाज विश्लेषक कृष्णानंद होसाळीकर यांनी 5 व 6 जुलै रोजी दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 6 जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार आहे. अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्येही येत्या 2-4 दिवसात मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे. जीएसएफ मॉडेलनुसार, आज महाराष्ट्रातील पावसाची संभाव्य स्थिती लक्षात घेतल्यास खान्देशातील नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यात चांगल्या पावसाची स्थिती आहे. नंदुरबारमध्ये 70 ते 130 मिलिमीटर पाऊस होऊ शकतो. तर, धुळे व जळगावमध्ये 40 ते 70 मिमी पावसाची शक्यता आहे. (नकाशातील निळा व जांभळा भाग). पालघर, ठाणे, मुंबईसह कोकण किनारपट्टीला आज पाऊस चांगलाच झोडपून काढण्याची शक्यता आहे. कोकणातील काही भागात 130 हून अधिक 200 मिमी पर्यंत पावसाची शक्यता दिसत आहे.