मुंबई (प्रतिनिधी) शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने म्हणजेच आयएमडीने (IMD) मान्सून 2025 चा अंदाज जाहीर केला. हवामान खात्याने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, यावर्षी भारतात सरासरीपेक्षा 105% अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबतच, भारतीय उपखंडात यावर्षी मान्सून दरम्यान एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.
2025 चा नैऋत्य मान्सून यावर्षी सामान्यपेक्षा जास्त राहणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तविला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान देशात सरासरी 105 टक्के पाऊस पडू शकतो, जो दीर्घकालीन सरासरीपेक्षा (LPA) जास्त आहे. आयएमडीनुसार, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि आंध्र प्रदेशसह बहुतेक राज्यांमध्ये यावर्षी चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. हे सलग दुसरे वर्ष असेल जेव्हा आयएमडीने सामान्यपेक्षा जास्त मान्सूनचा अंदाज वर्तवला असेल.
भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) प्रमुख मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, चार महिन्यांच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) भारतात सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय हवामान विभागाने सांगितले की, मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या (एलपीए) किमान 105 टक्के असण्याची अपेक्षा आहे. भारतीय उपखंडात सामान्यपेक्षा कमी मान्सून पावसासाठी जबाबदार असलेली एल निनो स्थिती यावेळी विकसित होण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी सांगितले.