मुंबई – बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या नव्या कमी दाब पट्ट्यामुळे आज, शुक्रवार, 26 सप्टेंबरपासून पुढील तीन दिवस म्हणजे रविवार, 28 सप्टेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. महिनाअखेरपर्यंत राज्यात सर्वत्र ढगाळ हवामान राहण्याची शक्यता असून काही भागात रविवारनंतरही पावसाचा जोर राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, राज्य सरकारने किमान 5 ऑक्टोबरपर्यंत तरी मान्सून महाराष्ट्रातून निरोप घेण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, आज राज्यातील 15 जिल्ह्यांसाठी भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) यलो अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्राच्या “या” भागात अतिमुसळधार
26 आणि 27 रोजी तेलंगणा व आंध्र प्रदेशचा किनारी भाग, ओडिसामध्ये मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान मराठवाडा; कोकण आणि गोव्यात तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र घाटमाथा, कोकण आणि गोव्यात 29 सप्टेंबर रोजीही अतिमुसळधार पाऊस राहू शकतो. याशिवाय, 27 ते 30 सप्टेंबर दरम्यान गुजरातमध्ये; 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान सौराष्ट्र, कच्छ परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यातील पावसासाठी आज अपडेटेड अलर्टस्
विदर्भ, लगतच्या मराठवाडा आणि उत्तर-मध्य व दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणात आज 26 सप्टेंबर दुपारनंतर हवामान ढगाळ होऊन बहुतांश ठिकाणी पावसाची वाढ अपेक्षित आहे. “आयएमडी”ने राज्यातील पावसासाठी आज सकाळी दहा वाजता जारी केलेले अपडेटेड अलर्टस् पुढीलप्रमाणे –

(सकाळी दहा वाजताची स्थिती)
यलो: जळगाव, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अकोला, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली.
• उर्वरित सर्व जिल्ह्यांसाठी तूर्तास पावसाचा कोणताही विशेष अलर्ट नाही. मात्र, वाऱ्याच्या जोर व दिशेनुसार दुपारनंतर संध्याकाळपर्यंत परिस्थितीत बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
• महाराष्ट्रालगत तेलंगणाच्या बहुतांश जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. सीमेलगत विदर्भ आणि मराठवाड्यात त्यामुळे सावधानतेचा इशारा आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशात सीमेलगत काही जिल्ह्यातही यलो अलर्ट स्थिती आहे.
रिटर्न मान्सूनची वाटचाल
सध्या संपूर्ण राजस्थानमधून मान्सून निघून गेला आहे. मध्य प्रदेशातील नीमच, भिंड, मुरैना आणि श्योपूर येथूनही मान्सूनने माघार घेतली आहे. आता पुढील तीन दिवसांत मध्यप्रदेशातील मान्सूनचा पाऊस पूर्णतः संपू शकतो. याशिवाय, पुढील 2-3 दिवसांत गुजरात, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या उर्वरित भागांमधून; तसेच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमधून मान्सूनच्या माघारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. महाराष्ट्रातील मान्सून मात्र लांबणार आहे. सध्या राज्यात नियमित मान्सून पाऊस सुरू असून परतीचा पाऊस अजून सुरू व्हायचा आहे.
राज्यातील सध्याच्या तीव्र हवामानाची कारणे
हवेतील चक्री वाताच्या प्रभावाखाली काल, गुरुवारी, 25 सप्टेंबर रोजी दुपारी, बंगालच्या उपसागराच्या मध्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. आज, शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी ते पश्चिम-वायव्येकडे म्हणजे सिंधुदुर्ग, गोवा, कारवारच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. शिवाय, हे कमी दाब क्षेत्र दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यापासून बंगालच्या उपसागरावर कमी दाबाच्या पट्ट्यात म्हणजे डिप्रेशनमध्ये केंद्रित होण्याची शक्यता आहे. उद्या, शनिवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी ते दक्षिण ओडिशा, उत्तर आंध्र प्रदेश किनाऱ्यांवरून ओलांडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील या चक्रीवात म्हणजे सायक्लोनिक सर्क्युलेशनपासून तेलंगणा, उत्तर अंतर्गत कर्नाटक, दक्षिण महाराष्ट्र, गोवा किनाऱ्यापर्यंतचा मान्सून ट्रफ रेषा कायम आहे.

भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील 5 दिवसांत अंदमान आणि निकोबार बेटे, विदर्भ, छत्तीसगडमध्ये; 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान गंगीय पश्चिम बंगाल, ओडिशात 30-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. 26 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान उत्तर-मध्य व दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.