मुंबई : महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला आहे. पावसाने महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोर धरायला सुरुवात केली आहे. खरंतर, सुरुवातीच्या टप्प्यात मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. यानंतर मान्सून विदर्भाच्या वेशीत दाखल झाला आणि येथून पावसाचा वेग मंदावला. मात्र, 22 जून नंतर पावसाने उघडीप दिली आणि काही ठिकाणी अगदी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत होता. मात्र, आता पावसाचा जोर वाढला असून भारतीय हवामान विभागाने (IMD) सहा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. यातच पुण्यासह राज्यातील सहा जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून ऑरेंज अलर्ट हवामान विभागाकडून (IMD) जारी करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
उत्तर – मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना मान्सूनची प्रतिक्षा होती. मात्र, या भागामध्येही मान्सून पोहोचला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमधील काही भागांमध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, इतर अनेक ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
ठाणे, मुंबई, पालघर इथेही काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
मान्सून 27 जूनपर्यंत दिल्ली- पंजाबला पोहचेल
दिल्ली, पंजाब आणि हरियाणामध्ये मान्सून 27 जूनपर्यंत पोहचेल आणि 3 जुलैपर्यंत या राज्यांना मान्सून पूर्णपणे व्यापेल. तसेच येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून संपूर्ण मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशचा काही भाग व्यापणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून 27 जूनपर्यंत गुजरातचा निम्याहून अधिक भाग व्यापणार आहे.