राज्याच्या काही भागात 4-5 दिवस पुन्हा मुसळधार सुरूच राहणार असल्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात, बांगलादेश किनाऱ्यालगत नव्याने तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. मान्सूनच्या या नव्या प्रणालीमुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व लगतच्या राज्यातील काही भागात जोरदार पावसाचे अनुमान भारतीय हवामान खात्याने (IMD) जाहीर केले आहे.
बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) तयार झाले आहे. हे क्षेत्र आता खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील 24 तासांत हे क्षेत्र पश्र्चिम बंगालमधील गंगेचे खोरे (Gangetic West Bengal) ओलांडण्याची शक्यता आहे. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या काही भागात पुढील 4-5 दिवस पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटले आहे.
वरील IMD ने जारी केलेले छायाचित्र पाहा. त्यात राज्यात आज, 2 ऑगस्ट रोजी देण्यात आलेले जिल्हानिहाय पावसाचे अलर्ट दिसत आहेत. त्यानुसार, कोकण किनारपट्टीवर रत्नागिरी, रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट आहे. या भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट असून तिथेही चांगल्या पावसाची शक्यता आहे.