जगभरात हवामान दुष्चक्र अति तीव्र होत आहे. जगभरात कुठे अतिवृष्टी, महापूर, ओला दुष्काळ तर कुठे उष्णतेची लाट, असह्य उकाडा, भयंकर पाणीटंचाई असे परस्परविरोधी चित्र अलीकडे वारंवार पाहायला मिळत आहे. भूमध्यसागरीय खोरे आणि आग्नेय प्रदेश हे हवामान बदलाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहेत, ज्याचा जगभरातील, मुख्यत: युरोपातील आरोग्यावर सर्वाधिक परिणाम होत आहेत. 2024 च्या उन्हाळ्यातील अवघ्या चार महिन्यात, युरोपातील उष्णतेच्या लाटेत 62,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
नवीन आकडेवारीनुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान युरोपमध्ये उष्णतेमुळे होणारे 62,775 मृत्यू झाले. मागील वर्षीच्या उन्हाळ्याच्या तुलनेत ही वाढ 23.6 टक्के आहे . युरोपियन युनियनच्या कोपर्निकस क्लायमेट सर्व्हिसनुसार, 2024 चा उन्हाळा युरोपमधील सर्वात उष्ण होता. युरोपमधील गेल्या वर्षीच्या विक्रमी उष्णतेने हजारो लोकांचा जीव घेतला. अति तापमानाचे आशिया अन् आफ्रिकन खंडातील दुष्चक्र आता गारेगार युरोपच्या भागात पोहोचले आहे. हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या दिवसेंदिवस “अत्यंत असुरक्षित” होऊ लागला आहे.
2022 पासून उष्णतेशी संबंधित 1,81,000 मृत्यू
बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ (ISGlobal) च्या नेतृत्वाखालील अभ्यासात 32 देशांमधील 654 प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले गेले. 2022 ते 2024 पर्यंत उष्णतेशी संबंधित कारणांमुळे 1,81,000 हून अधिक मृत्यूंना जोडले गेले. तथापि, लंडनमधील एट व्हर्सा या शाश्वतता सल्लागार संस्थेचे संचालक ख्रिस हॉकनेल म्हणतात की, हे आकडे लक्षणीयरीत्या कमी लेखले गेले असण्याची शक्यता आहे. म्हणजे उष्णतेच्या मृत्यूंची संख्या प्रत्यक्षात यापेक्षा कितीतरी जास्त असू शकते. ते सांगतात की, “उष्णतेमुळे होणाऱ्या अनेक मृत्यूंची नोंद होत नाही. काही बाबतीत हे कोविडसारखेच आहे: उष्णतेमुळे अनेकदा विद्यमान आरोग्य परिस्थितीवर ताण वाढतो, म्हणूनच खरे आकडे दडवले जातात. अशा स्थितीत वृद्ध लोक विशेषतः जास्त असुरक्षित असतात. उष्णतेचा ताण हा मृत्यूचे थेट कारण होता की, एक कारणीभूत घटक होता, हे नेहमीच स्पष्ट नसते, परंतु सांख्यिकीय संकेत स्पष्ट आहे; अति उष्णतेच्या घटनांमध्ये मृत्युदर वाढतोय.”
इटलीला उष्णतेचा सर्वाधिक फटका
नेचर मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात असे आढळून आले आहे की, उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत , जिथे चार महिन्यांच्या कालावधीत 19,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. उन्हाळ्यातील उष्णतेच्या लाटा, दुष्काळ आणि पुरामुळे युरोपला अब्जावधींचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असा इशारा अभ्यासातून देण्यात आला आहे. या उन्हाळ्यात युरोपातील उष्णतेच्या लाटांमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या हवामान बदलामुळे तिप्पट झाली, असे अभ्यासात म्हटले आहे. रोम आणि पालेर्मो सारख्या शहरांमध्ये 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. असे मानले जाते की, देशातील वाढत्या तापमानामुळे, तसेच तेथील मोठ्या प्रमाणात असलेली वृद्ध लोकसंख्या मृतांच्या संख्येत वाढ होण्यास कारणीभूत ठरली. खरं तर, 75 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये, इतर सर्व वयोगटातील लोकांपेक्षा अंदाजे मृत्युदर 323 टक्के जास्त होता. महिलांमध्ये उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही पुरुषांच्या तुलनेत 46.7 टक्के जास्त होते.
कोणत्या युरोपीय देशांमध्ये उष्णतेमुळे किती मृत्यू?
2024 मध्ये युरोपात उष्णतेमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये स्पेन दुसऱ्या क्रमांकावर होता, जिथे 6,743 जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर जर्मनीमध्ये 6,282, ग्रीसमध्ये 5,980 आणि रोमानियामध्ये 4,943 जणांचा समावेश आहे. बल्गेरिया (3,414), सर्बिया (2,515), फ्रान्स (2,451), पोलंड (1,780) आणि हंगेरी (1,433) यांनीही सर्वाधिक प्रभावित झालेल्या 10 देशांच्या यादीत स्थान मिळवले.
2022-23 पेक्षा 2024 मध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त
देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत मृत्युदराच्या बाबतीत ग्रीसमध्ये उष्णतेशी संबंधित मृत्युदर सर्वाधिक म्हणजे दर दहा लाखात 574 मृत्यू झाले. त्यानंतर बल्गेरिया (दर दशलक्षात 530 मृत्यू) आणि सर्बिया (दर दशलक्षात 379 मृत्यू) यांचा क्रमांक लागतो. संशोधकांनी अधोरेखित केले आहे की, हे दर 2022 आणि 2023 च्या उन्हाळी कालावधीसाठी अंदाजित केलेल्या दरांपेक्षा “लक्षणीयपणे जास्त” होते. उदाहरणार्थ, ग्रीसमध्ये 2023 मध्ये दर दशलक्षात 373 मृत्यूंची नोंद झाली.
जागतिक सरासरीपेक्षा युरोपमध्ये दुप्पट तापमानवाढ
जागतिक सरासरीपेक्षा युरोप या खंडात सर्वाधिक वेगाने, जवळजवळ इतरांपेक्षा दुप्पट दराने तापमान वाढत आहे, असे आयएसग्लोबल आणि रेसेटोक्सचे संशोधक आणि टॉमस जानोस सांगतात. त्यांनी सांगितले की, “युरोपमध्ये, भूमध्यसागरीय खोरे आणि आग्नेय प्रदेश हे हवामान बदलाचे प्रमुख केंद्र म्हणून उदयास येत आहेत, ज्यांचा आरोग्यावर सर्वात जास्त परिणाम होत आहे आणि 21 व्या शतकात उष्णतेशी संबंधित मृत्युदरात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे.”
वणव्याच्या अनेक घटना, पर्यटन स्थळे तात्पुरती बंद
युरोपमध्ये गेल्यावर्षी आणखी एका कडक उन्हाळ्यानंतर आयएसग्लोबलचे निष्कर्ष आता आले आहेत. गेल्या वर्षी उष्णतेमुळे धोकादायक वणव्यांचे अनेक प्रकार घडले, पर्यटन स्थळे तात्पुरती बंद झाली आणि अति उष्णतेमुळे होणारे मृत्यू हेडलाइन बनले. शहरात उच्च तापमानाचा इशारा असताना बाहेर सात तास काम केल्यानंतर 28 जून 2204 रोजी बार्सिलोनामध्ये 51 वर्षीय रस्ता सफाई कामगार मोंटसे अगुइलर यांचे निधन झाले. इटलीच्या सॅन लाझारो डी सवेना येथील 47 वर्षीय बांधकाम कामगार ब्राहिम ऐत एल हज्जम यांचाही कार पार्किंगच्या मजल्यावर कोसळून मृत्यू झाला.
हवामान बदलामुळे उष्णतेच्या मृत्यूंचे प्रमाण वाढतेय का?
हवामान बदलामुळे संपूर्ण युरोपमध्ये तापमान वाढले आहे – विशेषतः 2024 उन्हाळ्यात! आघाडीच्या शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, यामुळे 2025 मध्येच आतापर्यंत 16,500 अतिरिक्त मृत्यू झाले आहेत. इम्पीरियल कॉलेज, लंडन आणि लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसिन येथील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणातून असा अंदाज आहे की, या उन्हाळ्यात उष्णतेमुळे झालेल्या 24,400 अंदाजे मृत्यूंपैकी 68 टक्के मृत्यूंसाठी हवामान बदल जबाबदार होता, ज्यामुळे तापमान 3.6 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले.
सरासरीपेक्षा 6 अंश सेल्सिअस जास्त तापमान
2024 मध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात उष्ण ऑगस्ट महिन्यात नैऋत्य युरोप अति उष्णतेने जळून खाक झाला. हजारो लोकांचा मृत्यू करणाऱ्या उष्णतेच्या लाटांशी संबंधित जीवाश्म इंधनाच्या महाकाय घटकांचे प्रदूषण, अभ्यासात आढळून आले आहे. 21 ते 27 जुलै दरम्यान एकाच उष्णतेच्या लाटेत, रोमानिया, बल्गेरिया, ग्रीस आणि सायप्रसमध्ये सरासरीपेक्षा 6 अंश सेल्सिअस जास्त तापमानामुळे सुमारे 950 मृत्यू उष्णतेने झाले. याचा अर्थ दर दशलक्ष लोकांमागे दररोज 11 मृत्यू असे प्रमाण होते.
इम्पीरियल कॉलेज लंडनच्या ग्रँथम इन्स्टिट्यूट – क्लायमेट चेंज अँड द एन्व्हायर्नमेंट येथील व्याख्याते डॉ. गॅरीफॅलोस कॉन्स्टँटिनोडिस यांनी उष्णतेच्या वाढत्या लाटा हा एक गंभीर इशारा असल्याचे म्हटले आहे. ते सांगतात की, “अतिवृष्टी हा सर्वात घातक प्रकार असल्याचे मानले तरी, सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणण्यासाठी वाढत्या उष्णतेला बराच काळ कमी लेखले गेले आहे.” उन्हाळ्यातील मृत्यूची संख्या गगनाला भिडण्यापासून रोखण्यासाठी, हॉकनेल असा युक्तिवाद करतात की, विशेषतः दक्षिण युरोपमधील देशांनी उष्णता रोखणारी आणि अतिताप सहन करू शकणारी घरे यासारख्या “चांगल्या पायाभूत सुविधा” ठेवून बदलत्या पर्यावरणीय संकटाशी लढण्याची तयारी करणे आवश्यक आहे. याशिवाय, विशेषतः लंडन आणि इतर युरोपीय शहरांमध्ये आणखी एक समस्या तीव्र आहे, ती म्हणजे कार्बन उत्सर्जन शाश्वतता नियमनाने प्रभावीपणे थंडगारपणा बेकायदेशीर ठरवला आहे. युरोपमधील फक्त 20 टक्के घरांमध्येच एअर कंडिशनिंगची सुविधा उपलब्ध आहे, तर अमेरिकेत ही संख्या जवळपास 90 टक्के आहे.”