जळगाव : हरभरा हे महाराष्ट्रातील प्रमुख डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पिकाच्या उत्पादनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. या बाबींचा विचार केला तर हरभरा लागवड व उत्पादनास तसेच महाराष्ट्रात मोठा वाव आहे. जाणून घ्या.. पेरणीनंतरचे ते काढणी पर्यंतचे व्यवस्थापन.
अलीकडे पर्यावरणातील वाढता असमतोलपणा, अपुरे पाऊस त्यामुळे निर्माण होणारी दुष्काळी परिस्थिती, कीड व रोगांचा वाढता प्रभाव, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अशा बाबींमुळे भारतातील प्रति हेक्टरी हरभरा पिकाची उत्पादकता मात्र कमी आहे. यासाठी कृषि विद्यापीठाने विकसित सुधारित व संकरित वाणांचा अधिकाधिक लागवडीसाठी वापर करणे तसेच शास्त्रोक्त पद्धतीने शेती व्यवसाय करणे हाच एकमेव पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे शेतीतून निरनिराळ्या पिकाचे अधिकाधिक व दर्जेदार उत्पादन घेऊन स्वत:चे आर्थिक सशक्तीकरण करून देशाच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणे हे प्रथम कर्तव्य आहे. असे समजून पीक उत्पादन घेणे अत्यंत आवश्यक आहे.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
बीजप्रक्रिया आणि जीवाणूसंवर्धन
बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रतिकिलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे अथवा २ ग्रॅम थायरम अ, 5 ग्रॅम कार्बन्डॅझीम एकत्र करून प्रति किलो बियाण्यास चोळावे. यानंतर 10 किलो बियाण्यास रायझोबियम जिवाणू संवर्धनाचे 250 ग्रॅम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे. गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात 125 ग्रॅम गूळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे. बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी. यामुळे हरभ-याच्या मुळावरील ग्रंथीचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो आणि पिकाचे 3 ते 5 टक्के उत्पादन वाढते.
बियाणे प्रमाण
हरभऱ्याच्या विविध दाण्यांच्या आकारमानानुसार बियाण्याचे प्रमाण वापरल्याने हेक्टरी रोपाची संख्या अपेक्षित मिळते. विजय या मध्यम दाण्याच्या वाणाकरिता 65 ते 70 किलो, तर विशाल, दिग्विजय आणि विराट या टपो-या दाण्यांच्या वाणाकरिता 100 किलो प्रति हेक्टर या प्रमाणात बियाणे पेरणीसाठी वापरावे. तसेच कृपा आणि पी. के. व्ही. 4 या जास्त टपोच्या काबुली वाणांकरिता 125 ते 130 किलो प्रतिहेक्टर बियाणे वापरावे. हरभरा सरी- वरंब्यावरही चांगला येतो. 90 सें.मी. रुंदीच्या स-या सोडाव्यात व वरब्यांच्या दोन्ही बाजूला 10 सें.मी. अंतरावर बियाणे टोकण करावे. काबुली वाणासाठी जमीन ओली करून वापशावर पेरणी करावी.
खते
सुधारित हरभऱ्याचे नवे वाण खत आणि पाणी यास चांगला प्रतिसाद देतात, त्यासाठी खताची मात्रा योग्य प्रमाणात देणे गरजेचे आहे. प्रती हेक्टरी चांगले कुजलेले 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेवटच्या कुळवणीच्या वेळी शेतात पसरावे. पिकाची पेरणी करताना 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर म्हणजेच 125 किलो डायअमोनियम फॉस्फेट (डी.ए.पी) अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटेंश अथवा 50 किलो युरिया आणि 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट अधिक 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश प्रति हेक्टरला द्यावे. संतुलित खतांच्या वापरामुळे उत्पादनात 18.55 टक्के इतकी वाढ झाल्याचे प्रयोगांती आढळून आले आहे. पीक फुलो-यात असताना 2 टक्के युरियाची पहिली फवारणी आणि त्यानंतर 18-15 दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी, यामुळे पीक उत्पादनात वाढ होते.
आंतरमशागत
पिकाच्या जोमदार वाढीसाठी पहिल्या 30 ते 45 दिवसात शेत तणविरहित ठेवणे हे उत्पादन वाढण्याचा दृष्टीने आवश्यक आहे. तण व्यवस्थापनामुळे एकूण उत्पादनात 20.74 टक्के वाढ होते. पीक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली कोळपणी आणि 30 ते 35 दिवसाचे असताना दुसरी कोळपणी करावी. कोळपणी केल्याने जमिनीतील बाष्पीभवनाचा वेग कमी होऊन ओल अधिक काळ टिकण्यास मदत होते. तसेच दोन ओळीतील तण काढले जाऊन रोपांना मातीची भर लागते. कोळपणीनंतर दोन रोपातील तण काढण्यासाठी लगेच खुरपणी मजुराअभावी खुरपणी करणे शक्य नसल्यास पेरणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेंडिमिथिलिन या तणनाशकाची 2.5 ते 3 लिटर प्रती हेक्टर 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
पाणी व्यवस्थापन
जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूपच कमी असेल आणि एखाद्ये पाणी देणे शक्य असेल तर हरभरा पिकाला फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रानबांधणी करताना दोन सर्यातील अंतर कमीतकमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुधा जमिनीच्या उतारानुसार कमी ठेवावी, म्हणजे पिकला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि ६५ ते ७० दिवसांनी तिसरे पाणी द्यावे.
हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 से.मी पाणी लागते. प्रत्येकवेळी पाणी प्रमाणशीर (7 ते 8 से.मी) देणे महत्वाचे असते. जास्त पाणी दिले तर पिक उभळन्याचा धोका असतो. स्थानिक परिस्थितीनुसार व जमिनीच्या खोलीनुसार पाण्याच्या दोन पाळ्यांमध्ये अंतर ठेवावे. जमिनीस फार मोठ्या भेगा पडू देऊ नयेत. हरभरा पिकास एक पाणी दिल्यास 30 टक्के, दोन पाणी दिल्यास 60 टक्के आणि तीन पाणी दिल्यास उत्पादनात दुप्पट वाढ होते.
तुषार सिंचन : हरभरा पिकास वरदान
हरभरा पिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास आणि सुधारित वाणांची लागवड केल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्याने गरजेपेक्षा अधिक पाणी दिल्यास पीक उभळते आणि त्यामुळे उत्पादनात मोठी घट येते. यासाठी या पिकास तुषार सिंचन ही अतिशय उत्कृष्ट पद्धत आहे. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास पाहिजे तेवढे आणि आवश्यक त्या वेळेला पाणी देता येते. पिकात तणांचा प्रादुर्भाव नेहमीपेक्षा तुषार सिंचन पद्धतीत कमी होतो आणि असलेले तण काढणे अतिशय सुलभ जाते. नेहमीच्या पद्धतीत पिकास अनेकदा प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यामुळे मुळकुजसारखे रोग पिकावर येतात आणि पीक उत्पादन घटते. परंतु तुषार सिंचनाने पाणी अतिशय प्रमाणात देता येत असल्याने मूळकुज रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते.
आंतरपिके
हरभरा पिकाचे मोहरी, करडई, ज्वारी, ऊस या पिकांबरोबर आंतरपीक घेता येते. हरभ-याच्या दोन ओळी आणि मोहरी अथवा करडईची एक ओळ याप्रमाणे आंतरपीक घ्यावे. हरभ-याच्या सहा ओळी आणि रब्बी ज्वारीच्या दोन ओळी याप्रमाणे आंतरपीक फायदेशीर आहे. उसामध्ये सरीच्या दोन्ही बाजूस किंवा वरंब्याच्या टोकावर 10 सें.मी. अंतरावर हरभ-याची एक ओळ टोकण केल्यास हरभ-याचे अतिशय चांगले उत्पादन मिळते. त्याबरोबरच हरभ-याचा बेवड उसाला उपयुक्त ठरून उसाच्या उत्पादनात वाढ होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन (घाटे अळी नियंत्रण)
घाटे अळी ही हरभ-यावरील मुख्य कीड आहे. घाटे अळी ही ज्वारी, वाटाणा इ. पिकांवर उपजीविका करत असल्यामुळे या किडीचे वास्तव्य शेतात वर्षभर राहते. म्हणून जमिनीची निवड करताना खरीप हंगामात यापैकी पिके घेतली असल्यास अशा जमिनीत हरभ-याचे पीक घेऊ नये. पिकांच्या फेरपालटीकरिता तृणधान्य अथवा गळीतधान्याची पिके घ्यावीत. तसेच जमिनीची खोल नांगरट करावी.
शेतात हेक्टरी 10 ते 12 कामगंध सापळे लावावेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पतंग अडकले जाऊन पुढील प्रजननास आळा बसतो. पक्षांना बसण्यासाठी दर 15 ते 20 मीटर अंतरावर काठ्या रोवाव्यात किंवा मचाण बांधावीत म्हणजे कोळसा पक्षी, चिमण्या, साळुंकी, बगळे इ. पक्षी पिकावरील अळ्या पकडून खातात. कोड नियंत्रण प्रभावी होण्याकरिता एकाच कीटकनाशकाचा सारखा वापर न करता फवारणीकरिता आलटून-पालटून औषधे वापरावीत.
हरभरा पिकास फुलकळी येऊ लागताच 5 टक्के निंबोळी अर्काची (25 किलो/ हे.) पहिली फवारणी करावी. यासाठी 5 किलो निंबोळी पावडर 10 लिटर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवावी. दुस-या दिवशी सकाळी कापडाच्या सहाय्याने त्याचा अर्क काढावा आणि त्यामध्ये आणखी 90 लिटर पाणी टाकावे. असे एकूण 100 लिटर द्रावण 20 गुंठे क्षेत्रावर फवारावे. पहिल्या फवारणीनंतर 10 ते 15 दिवसांनी हेलिओकील (विषाणूग्रासीत अळ्यांचे द्रावण) 500 मि.लि. 500 लिटर पाण्यातून प्रति हेक्टरला फवारावे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- बंपर उत्पादनासाठी रब्बीत अशी करा हरभरा लागवड ; जाणून घ्या.. ”पूर्वमशागत आणि पेरणीची वेळ” भाग – 1
- Agricultural drones : वडिलांची मेहनत पाहून मुलाने कमालच केली शेती उपयोगासाठी बनवला कृषी ड्रोन
Comments 2