मुंबई : वातावरणातील बदलामुळे राज्यातील शेतकरी या वर्षी कमालीचा हैराण झाला आहे. कशी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन… असा दुहेरी सामान शेतकरी करीत आहे. सध्या कडाक्याचे ऊन असल्याने कधी मान्सूनचे आगमन होईल, याची प्रतीक्षा सर्वांना लागून आहे. अशातच भारतीय हवामान तज्ज्ञांनी शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी दिली आहे. मान्सून वेगाने पुढे सरकत असून लवकरच तो महाराष्ट्रात दाखल होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य सध्या प्रचंड कडाक्याचा सामना करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना देखील मान्सूनची प्रतीक्षा लागली आहे. मात्र, मान्सून दाखल होण्यापूर्वी राज्यात पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार, राज्यात 20 व 21 मे रोजी ढगाळ वातावरण राहणार आहे. पावसाळा सुरु होण्यास काहीच दिवस बाकी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे उरकून घ्यावीत, तसेच ज्या शेतकऱ्यांची भुईमूग काढणी बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कामे उरकून घ्यावीत, असा सल्ला देखील पंजाबराव डख यांनी दिला आहे.
मान्सून राज्यात कधी दाखल होणार ?
अंदमान बेटावर दि. 21 व 22 मे रोजी मान्सूनचे आगमन होणार असून दि. 26 व 27 मे रोजी मान्सून वेगाने पुढे सरकणार आहे. तसेच दि. 8 जून नंतर मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी सांगितले आहे. राज्यातील काही भागात दि. 22, व 23 मे रोजी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यांनतर दि. 31 मे ते 3 जून दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत पावसाळ्यासारखा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे तर दि. 4 जून ते 6 जून पर्यंत हवामान मोकळे राहील. त्यानंतर दि. 8 जून रोजी मान्सूनला सुरुवात होणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.
काय आहे हवामान विभागाचा अंदाज?
हवामान विभागाकडून, दि. 22 व 23 मे रोजी काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दि. 22 रोजी चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम, यवतमाळ तर दि. 23 रोजी बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येलो अलर्ट देण्यात आलेल्या जिल्ह्यांमध्ये 30 ते 40 कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहतील.