गोवा म्हणजे फक्त समुद्रकिनारे नव्हे. तर त्याही पलिकडे जाऊन गोव्याची एक वेगळी ओळख सांगते येते. नैसर्गिक सौंदर्य, विपुल वन्यजीव आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि पारंपरिक प्रथांचं ठिकाण म्हणजे गोवा. म्हणूनच गोव्याला कोकण काशी किंवा देवभूमी म्हणून ओळखले जाते. गोव्याला सण, कर्मकांड आणि प्रथांचा समृद्ध आणि सर्जनशील वारसा आहे. हिंदू पुराणांनुसार देव प्रत्येक कणाकणात आहे. त्यामुळे गोव्यात प्रत्येक स्वरूपातील देवाची पूजा करणे हे सर्वसामान्य आहे. गोव्यातील अशीच एक विलक्षण प्रथा म्हणजे मगरीची उपासना अर्थात ङ्गमानगे थापणे.
मानगे थापणे म्हणजे काय?
गोव्यातील अनेक गावात खाजण शेती करणार्या शेतकर्यांमध्ये खाजण शेतीला सुरुवात करण्यापूर्वी पौष अमावस्येला ङ्गमानगे थापणेफ हा विधी परंपरेनुसार केला जातो. मानगे म्हणजे मगर. खाजण शेती करताना मगरींपासून कोणता त्रास होऊ नये, यासाठी मातीपासून तयार केलेल्या मगरीच्या प्रतिकृतीची पूजा करण्याची परंपरा रुढ आहे. खाजण शेतात मच्छउत्पादन तसेच शेती करणारे या दिवशी खाजण शेतात ही पूजा करतात.
नवदुर्गा देवीच्या खाजण शेतात केली जाते पूजा
ओहोटीवेळी खाजनबांधच्या आसपास असलेली चिकणमाती गोळा करतात. शिंपले, काठ्या तसंच अंड्यांचा उपयोग करून मगरीची प्रतिकृती तयार केली जाते. यानंतर हळद-कुंकू लावून तसंच नारळ व चुरमुर्यांचा नैवेद्य दाखवून प्रतिकृतीची पूजा केली जाते. स्थानिक भाषेत याला ङ्गमानगे थापणेफ म्हटले जाते. मानगे या शब्दाचा अर्थ मगर असून ङ्गथापणे म्हणजे घडवणे.फ फोंड्यात अडुळशी येथील देवाचेकातोर येथे बोरीच्या नवदुर्गा देवीच्या नावाने ओळखल्या जाणार्या खाजण शेतात ही पूजा दरवर्षी होते. 24 शेतकरी ही खाजण शेती कसवतात. या पूजेत शेतकरी कुटुंबातील महिला सहभाग होत नाहीत.
… म्हणून करतात मगरीची पूजा
ङ्गमानगे थापणेफ हे परंपरागत एक देवकृत्य आहे. खाजण शेतात खाडीतील खारे पाणी आतबाहेर सोडण्यासाठी घालण्यात येणारा बांध हा अत्यंत महत्त्वाचा असतो. बांध फुटल्यास मगरीसारखे जीव फुटलेल्या बांधामागे शेतात येऊन पिकाची नासाडी करू शकतात. तसेच मगरीमुळे शेतकर्यांच्या जीवालाही हानी पोहोचू शकते. त्यासाठी मगरीला देवाचे स्थान देण्यात आले. बांधाच्या ठिकाणीच मगरीची प्रतिकृती स्थापन करून तिचे पूजन केले जाते व बांध तसेच शेतीचे रक्षण कर, असे मागणे मागितले जाते.
मानगे थापणे मागची मिथक कथा
श्री रामभक्त हनुमान हे माता सीतेच्या शोधात लंकेला गेल्यावर रावण पुत्र मेघनाद हनुमानाला पकडून रावणाच्या दरबारात आणतो. तेव्हा रावण हनुमानाच्या शेपटीला आग लावण्याचा आदेश देतो. त्यानंतर हनुमान जळत्या शेपटीने संपूर्ण लंका पेटवतो. आगीत जळलेल्या शेपटीमुळे हनुमानाला तीव्र वेदना होतात. वेदना शांत करण्यासाठी ते समुद्राजवळ पोहचतात. त्यावेळी हनुमानाच्या घामाचा एक थेंब काठावरच्या एका मगरीच्या मुखात पडतो. त्यातून मगर गर्भवती होते व मगरध्वजचा जन्म होतो. मगरध्वजाची शक्ती पाहून रावण त्याला पाताळलोकचा व्दारपाल नियुक्त करतो. खाजन शेती करणारेही मगरीला मगरध्वज मानून तिची पूजा करतात. ङ्गमानगे थापणेफ हा मगरध्वजाला दिलेला मान असल्याचे खाजण शेतकर्यांचे म्हणणे आहे.
खाजण शेती म्हणजे काय?
खाडीत व छोट्या आखातांत समुद्राचे खारे पाणी व भूखंडावरून येणारे गोडे पाणी यांची मिसळ होते. नद्यांनी व समुद्रप्रवाहांनी वाहून आणलेल्या गाळांचे अशा ठिकाणी छोट्या गोट्यांत रूपांतर होऊन त्यांचे निक्षेपण होते. हा नव्याने बनलेला भूभाग कालांतराने ओहोटीच्या वेळी उघडा पडू लागतो व खार्या पाण्यावर वाढणारे वनस्पतिप्रकार तेथे उगवू लागतात. त्यांच्या मुळांशी निक्षेपणाचे कार्य विशेष जलद होऊन भरतीच्या वेळीही जेमतेम उघडी पडेल इतकी या भूभागाची उंची वाढते. या भूभागास खाजण असे नाव आहे. विशिष्ट तर्हेचा बांध बांधून खाजणाचा शेतीस उपयोग करून घेतात. गोव्यात खाजणात भात शेती केली जाते. कोकणात मात्र मीठ तयार होते, त्या खाजण जमिनीला आगर म्हणतात. महाराष्ट्राच्या पश्चिम कनारपट्टीलगत नद्यांच्या मुखाशी भरती-ओहोटीच्या पाण्याच्या पातळीच्या दरम्यान खाड्यांची निर्मिती झाली आहे. या खाड्यांच्या दलदलयुक्त खाजण क्षेत्रात खारफुटीची बने खाजण वने आढळतात. या वनांना कांदळवन असेही संबोधतात.
अशी तयार करतात मगरीची प्रतिकृती
खाजण शेती करणारे वर्षांत सहा वेळा खाजन शेतीच्या ठिकाणी पूजापाठ करतात. शेतीसाठी जमीन खणताना, मळणी, पेरणी, कापणी प्रत्येकवेळी नारळ वाढून स्थळदेवतेला अर्घ्य वाहिले जाते. चिकण मातीपासून मगराची प्रतिकृती घडवणारे यासाठी बरीच मेहनत घेतात. मगरीचे टोकदार दात, धारधार नखे, अंगावरची खवले आदींसाठी छोट्या काठ्या, शिंपले, अंड्यांचा उपयोग केला जातो.
– धनश्री मणेरीकर, पणजी