महाराष्ट्रात दिवाळी एक दिवस आधी म्हणजेच द्वादशीपासून सुरू होते. आपल्याकडे दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. ही गोवत्स द्वादशी म्हणजे या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. शेतकऱ्यांच्या जीवनात गाय आणि वासरांचे खूप महत्त्वाचे स्थान आहे. हा सण मुळात गायीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. त्यामुळे या दिवशी संवत्स म्हणजे वासरासह गायीची पूजा केली जाते. त्यासोबत गोठयातील इतर ढोरावासरांचीही पूजा केली जाते. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, यासाठी ही पूजा. पूजेदरम्यान त्यांना गव्हापासून बनवलेले पदार्थ खायला दिले जातात. (खान्देशात पूर्वी नैवेद्यासाठी गव्हाऐवजी बाजरीचाच वापर व्हायचा)
वसुबारसेला हातमोडे कणीसाचे धान्य खाण्याची खान्देशात प्रथा आहे. थोड्या-बहुत फरकाने, वेगळ्या नावाने महाराष्ट्रात इतरत्रही ती असेलच. हातमोडे कणीस म्हणजे परिपक्व झालेले हाताने मोडलेले (खुडलेले) बाजरीचे कणीस. कणीस कापण्यासाठी विळा किंवा लोखंडी साधन वापरले जात नाही. कापणी झालेली असेल तर साठवलेले कणीस हाताने मोडले जाते. खान्देशात पूर्वी बाजरी मोठ्या प्रमाणावर व्हायची, गव्हाचा पेरा अलीकडे वाढला. त्या कणसांना पिटणी किंवा मोगरीने ठोकून बाजरीचे दाणे वेगळे काढायचे. हे धान्य चक्कीत, गिरणीत दळायचे नसते, ते लोखंड नसलेल्या घरच्या जात्यावर, घट्यावर दळायचे. याच पिठाच्या भाकरी मातीच्या परातीत (परोळे) थापायच्या अन् मातीच्याच तव्यावर (एकोटी, एखुटी) शेकायच्या. भाकरी उलथवायला उलथणे (उचटणे) वापरायचे नसते.
या दिवशी गहू, मूग, दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. खान्देशात या दिवशी उपवास करणाऱ्या स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. वसुबारसेला शेतकरी एकमेकांच्या घरी, गोठ्यात जाऊन ‘आली आली रे दिवाई, दिवा करजो भाताचा’ सारखी दिवाळीची गाणी म्हणतात. शेतकरी या दिवशी गाईचे दूध काढत नाही ते वारसालाच पिऊ देतात.
“वसु म्हणजे धन” अन “गाई” हयाच शेतकऱ्यांच्या धन आहेत. कारण शेतकऱ्यांची शेती कसणारा बैल हा गाईच्या पोटातुनच वासरु म्हणून जन्माले येतो अन जरा मोठा झाला की शेतकऱ्याच्या जमिनीच्या मशागतीसाठी कष्ट घेऊ लागतो. अन दुसरे म्हणजे गाईचे दूध, दही, तूप विकून शेतकऱ्यांचा घर खर्च भागतो. गाईचे शेतकरी लोकांवर खूप उपकार आहेत, ते फेडण्यासाठी वसुबारशेला गाई-वासरांची मनोभावे पूजा केली जाते.
आता शहरी भागात गौ-शाळेत जाऊन वसुबारस साजरी करतात किंवा बहुतांश लोक तर आता घरातच धातुची किंवा मातीची गायवासरांची मुर्ती आणून त्यांची पूजा करतांना दिसून येतात.
गवारीचीच भाजी का?
आता वसु बारसला गवारीचीच भाजी का? असा प्रश्न मनात आला असेल नाही का? तर गवार अर्थात क्लस्टरबीन ही एक अत्यंत उपयुक्त, बहुगुणी आणि सहज सर्वत्र स्वस्तात उपलब्ध होणारी भाजी आहे. पूर्वी अनेक शेतकरी शेतात एखाद-दोन सरी गवार लावायचे. अगदी सहज उगवणारे, फारशी मशागत, देखरेख न करता हे पीक व्हायचे. गवारीमध्ये प्रोटीन, विरघळणारे फायबर, कार्बोहाइड्रेट्स व्हिटॅमि, फॉस्फरस, कॅल्शियम, लोह तत्व आणि पोटॅशियम असते. एखाद्या टॉनिक प्रमाणे गवार उपयुक्त आहे. यामध्ये कोणतेही कोलेस्ट्रॉल किंवा फॅट आढळून येत नाही. यातील ग्लायको न्युट्रिएन्ट्स डायबिटीज रुग्णांसाठी वरदान आहे. याचे डायट फायबर्स अन्न पचन करण्यात मदत करतात. कॅल्शियम, आयर्न आणि पोटॅशियममुळे हाडे मजबूत होतात. शारीरिक कमजोर असलेल्यांना गवार उपयुक्त ठरते. हिवाळ्यातील साथ, संक्रमणाच्या काळात गवार खाणे हितवर्धक ठरते.