मुंबई : शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको. आता पाऊस पडला तरी जुलैपर्यंत धीर धरा, असा सबुरीचा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) मान्सून राज्यात दाखल झाल्याचे व येत्या 48 तासात महाराष्ट्रात सर्वत्र पोहोचण्याचे अनुमान वर्तविले आहे. दुसरीकडे, ‘स्कायमेट’ने मात्र सध्याचे बिपोरजॉय चक्रीवादळ विसर्जित होईपर्यंत मान्सून कमजोर राहण्याचे अनुमान जाहीर केले आहे. चक्रीवादळाच्या जोडीलाच ‘एल निनो’चे सावट यंदाही असणार आहे. हे सारे पाहता, अनियमित मान्सूनमुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे.
कृषी विभागाने यापूर्वीच पेरणीला जाण्यापूर्वी पावसाची तीव्रता पडताळून पाहण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे. यंदा ऑगस्टपर्यंत खरीपाची पेरणी सुरू राहणार असल्याच्या अनुषंगाने राज्य सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जुलैपर्यंत वाट पाहावी, असे सांगण्यात आले आहे.
कृषी विभागाने दिला हा इशारा
राज्यात मान्सूनचा पाऊस काही ठिकाणी सुरू झाला असला तरी खरीप पिकांच्या लवकर पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा इशारा महाराष्ट्र सरकारने दिला आहे. कृषी विभागाने मार्गदर्शक तत्त्वे जारी करून शेतकऱ्यांना स्पष्टपणे हा इशारा दिला आहे. पावसाची तीव्रता पडताळून न पाहता पेरणी केल्यास बियाणे उगवण होऊ शकत नाही. आपल्या परिसरात किमान 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पिकांची पेरणी सुरू करावी, असे सांगण्यात आले आहे. थोड्याशा पावसाच्या आधारावर पेरणी सुरू करू नका, असे कृषी विभागाने सांगितले आहे.
दरवर्षी साधारणपणे, 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात म्हणजे कोकण-मुंबईत येतो. हळूहळू सर्व 36 जिल्ह्यांमध्ये मान्सून तीव्र होतो आणि पेरणीचा हंगाम जूनच्या मध्यात सुरू होतो. मात्र, यंदा मान्सून लांबला आहे. काल मान्सून तळकोकणात आला असला तरी चक्रीवादळामुळे त्याची सक्रियता कमी राहण्याची शक्यता आहे. पावसाच्या पहिल्या काही सरींनंतर लगेच पेरणी सुरू करण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. कारण, सुरुवातीच्या अल्प पावसानंतर पुढील पावसासाठी दीर्घ अंतर राहिल्यास, बियाणे उगवत नाही किंवा पिकांची सुरुवातीची वाढ खुंटते. शिवाय, शेतकऱ्यांना “दुबार पेरणी” करावी लागते, ज्यामुळे त्यांच्या खर्चात भर पडते. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारच्या सूचनेनुसार, त्यादृष्टीने तालुका अधिकारी आणि कृषी केंद्रांसह जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना नियमित अलर्ट जारी करत आहे.
‘एल निनो’ने वाढविली चिंता
राज्यात कोकण पट्ट्याच्या तुलनेत, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भाचा काही भाग हा दुष्काळी भाग आहे. त्यात पॅसिफिक महासागरावर विकसित होत असलेल्या ‘एल निनो’ने चिंता आणखी वाढवली आहे. सरकार आणि हवामान तज्ञांना भीती आहे, की ‘एल निनो’मुळे उद्भवणारी हवामानाची स्थिती राज्यातील मान्सून आणखी कमकुवत करू शकेल.
“यंदा अल निनो हे चिंतेचे कारण आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, सरासरीच्या 85टक्के पाऊस पडला तरी सध्याच्या जलसंधारण प्रकल्पांतून आपण दुष्काळावर मात करू शकू,” असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी झालेल्या वार्षिक खरीप आढावा बैठकीत व्यक्त केला होता.
यंदाच्या खरीप आढावा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांनी जलयुक्त शिवार अभियान टप्पा 2 वर भर दिला. “आपल्याकडे पाण्याची व्यवस्था असायला हवी. काही जोरदार सरी पडल्या तरी शेतकऱ्यांना सहज पाणी मिळू शकते. संरक्षित सिंचन हा हवामानातील आव्हानांवर मात करण्याचा एक चांगला मार्ग आणि शाश्वत शेतीच्या दिशेने उत्तम पाऊल आहे,” असे ते म्हणाले होते.