पल्लवी शिंपी, जळगाव
हिंगळजवाडी येथील कमल कुंभार यांनी शेतमजूर म्हणून कामाला सुरुवात केली. गरजेनुसार बांगड्यांची देखील विक्री केली. नंतर त्या बचत गटाच्या प्रवाहात आल्या आणि त्यांच्या कर्तुत्वाने नशीबच पालटले. कमल कुंभार यांनी बचत गटाच्या माध्यमातून कुक्कुटपालन, शेळीपालन, गांडूळ खत निर्मिती प्रकल्प आदींसह विविध 10 व्यवसाय सुरू केले. कधीकाळी शेतमजूर म्हणून काम केलेल्या कमल यांनी आता इतर महिलांच्या हातालाही रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील हिंगळजवाडी येथील एका कुंभारी काम करणाऱ्या आणि रोजंदारीवर पोट भरणाऱ्या घरात कमल कुंभार यांचा जन्म झाला. कमल कुंभार यांचे 10 पर्यंतचे शिक्षण झाले आहे. 10 वी झाल्यानंतर त्यांचे लग्न विष्णू कुंभार यांच्याशी झाले. मात्र, सासर आणि माहेरची परिस्थिती हलाकीची होती. कमल यांच्या आई बांगड्या विकायच्या तर वडील चुली बनवून विकायचे. आईसोबत त्यांनी बांगड्या विकायचा व्यवसाय सुरु केला. यानंतर कमल यांना एका संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. हे काम करताना कमल यांनी संत गोरोबा काका सखी बचत गट या नावाने गटाची स्थापना केली आणि त्या गटाच्या सचिव झाल्या. सुरुवातीला त्यांना याविषयी काहीही माहिती नव्हती. मात्र, त्यांनी याची सगळी माहिती मिळविली आणि नवीन गोष्टी शिकून घेतल्या.
स्टेशनरी आणि साड्यांचा सुरु केला व्यवसाय
एका संस्थेत महिला मंडळ कार्यकर्ती म्हणून काम करत असताना कमल कुंभार यांना 300 रुपये मानधन मिळू लागले. यातूनच त्यांची अनेकांशी ओळख झाली. पुढे कमल यांनी स्वतःचा स्टेशनरी व्यवसाय सुरु केला. यानंतर साड्या विक्रीचाही व्यवसाय केला. कमल यांनी त्यांच्या गटाचे फेडरेशन केले आणि 25 गावातून संत गोरोबा काका सखी बचत गटाची निवड झाली. यात ज्या महिलेला छोटा व्यवसाय सुरु करणार आहे अशा महिलांना 30 हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार होते. यातील कमल यांच्यासह काही महिलांनी व्यवसायासाठी कर्ज घेतले. 2009 मध्ये कमल यांची ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली आणि याच वर्षी आशा कार्यकर्तीसाठी जागा निघाल्या होत्या. याचा फॉर्म देखील त्यांनी भरला आणि त्यांची आशा कार्यकर्ती म्हणून निवड झाली. याचे प्रशिक्षण घेतले यातून त्यांना दीडशे रुपये मानधन मिळत होते. कमल कुंभार यांच्या दोन्ही मुलांचा सांभाळ त्यांच्या आई करत असल्यामुळे त्यांना संस्था, आशा कार्यकर्ती, बचत गट, व्यवसाय अशा सगळ्या कामात त्यांना वेळ मिळत होता.
कमल कुंभार यांनी 2010 मध्ये एमएससीबीचे बिल वाटपाचे कॉन्ट्रॅक्ट मिळवले. बिल वाटपासाठी सशक्त सखी संस्थेच्या माध्यमातून कमल कुंभार यांनी 70 गावातून 90 महिलांची निवड केली. या महिलांच्या माध्यमातून कमल यांनी साडेचार लाख बिलांचे वाटप केले. यातून कमल यांना दोन दिवसात चार हजार रुपये मिळाले. हेच काम त्यांनी दोन वर्ष केले. त्यानंतर कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मेस सुरू केली तसेच 2012 ला ऊर्जा सखीचे काम सुरू केले. या सर्व कामातून याच वर्षी त्यांनी एक जागा खरेदी करून ठेवली. ज्या घरात कमल राहत होत्या ते घर पत्राचे होते नवीन घर बांधण्यासाठी कमल यांनी मेहनत करून पैसा गोळा केला आणि 2014 साली स्वतःचे घर बांधले.
सुरुवातीला खरेदी केल्या 10 शेळ्या
कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी कामात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि मेहनत हवी. कमल यांना शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आल्यात. पहिलीच अडचण त्यांना शेळीपालनाचा शेड उभारण्यासाठी लागणाऱ्या जागेची आली. व्यवसाय सुरू करण्यासाठी कमल यांची धडपड सुरू होती. त्यांनी भाडेतत्वावर जागा मिळण्यासाठी अनेक ठिकाणी विचारणा केली. मात्र, कुणीही भाडेतत्त्वावर जागा देण्यास तयार नव्हते. मग एका वकिलाकडून कमल यांना दहा एकर शेत भाडेतत्त्वावर मिळाले. या जागेवर त्यांनी चारी मारून शेळीपालनासाठी लागणारे शेड तयार केले. शेड तयार झाल्यानंतर कमल यांनी 10 शेळ्या खरेदी केल्या. मात्र, या व्यवसायातून त्यांना हवा तसा नफा होत नव्हता.
पोल्ट्री व्यवसायातून महिन्याला 3 लाखांची कमाई
2015 मध्ये कमल यांनी खेड्यापाड्यात जाऊन कोणता व्यवसाय चांगला चालेल यावर संशोधन केले. मग त्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला. यासाठी त्यांनी कडकनाथ कोंबड्यांची अंडी खरेदी केली. या अंडीतून पिल्ले झाली. यातून कोंबड्यांची संख्या वाढत गेली. त्यानंतर कडकनाथ कोंबड्यांचे अंडी विकण्याचा व्यवसाय सुरू झाला. या कोंबडीचे एक अंडे 50 रुपयाला विकले जाते तर कोंबडीच्या पिलांची किंमत 1 हजार इतकी आहे. या व्यवसायातून त्यांना महिन्याला एक ते दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळू लागले. हा व्यवसाय भरभराटीस येत असताना त्यांनी घोडे खरेदी केले. शेतात शेततळे घेऊन पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न सोडविला. गांडूळ खत तयार केले, एकंदरीत या व्यवसायातून महिन्याला तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेत आहेत. तसेच 1,000 ची क्षमता असलेले कोंबडीची पिल्ले तयार करण्याचे मशीन खरेदी केले. यातून देखील त्यांना 30 ते 40 हजार रुपये मिळत असल्याचे कमल कुंभार यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले.
कुटुंबाची मिळाली साथ
कमल या करत असलेल्या कामात त्यांचे पती विष्णू कुंभार यांची उत्तम साथ मिळत आहे. एवढेच नाहीतर कमल यांची मुले शिक्षण करत असून त्यांच्या कामात मदतही करत आहेत. कमल यांचा लहान मुलगा हा अकरावीचे शिक्षण घेत आहे. तर मोठा मुलगा हा कला या विषयात शिक्षण घेत असून ऑनलाईन व्यवहारात कमल यांना मदत करत आहे. कमल कुंभार या आज स्वतःचे विविध 10 व्यवसाय सांभाळत आहेत. ज्यात सेंद्रिय शेती, शेळीपालन, पोल्ट्री, स्टेशनरी, साडी विक्री, मेस, लाईट बील वाटप या व्यवसायांचा समावेश आहे.
महिलांसाठी ट्रेनिग सेंटर सुरु करण्याचे स्वप्न
आता ग्रामीण भागातील महिलांसाठी ट्रेनिग सेंटर सुरु करण्याचे कमल कुंभार यांचे स्वप्न आहे. विविध उद्योगाची माहिती पोहोचविणे, व्यवसाय कसा सुरु करायचा ?, सरकारी योजना, या सारख्या अनेक गोष्टींची माहिती या ट्रेनिग सेंटरच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचवायची असल्याचे कमल कुंभार यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले. जशी माझी आर्थिक परिस्थिती सुधारली आहे तशी प्रत्येक महिला आपल्या मुलाबाळांना सांभाळून स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकता, असे देखील त्यांनी सांगितले.
संपर्क :-
सौ. कमल कुंभार
हिंगळजवाडी, ता. जि. उस्मानाबाद
मो. 7038879434
शेतातील तण काढायचंय तेही काहीही त्रास न होता.. मग हा व्हिडीओ बघाच
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇