नवी दिल्ली : नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) ताज्या अहवालानुसार, देशात दर 2 तासांनी एक शेतमजूर आत्महत्या (Farm Labour Suicide) होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अहवालानुसार, 2021 मध्ये सुमारे 5,563 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे 18% इतकी वाढ झाली आहे.
कोविड साथीत शेतीनेच दिला जीडीपीला आधार
भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) वाढीसाठी कृषी हे एकमेव उज्ज्वल स्थान असल्याचे आजवर म्हटले जात होते. गेल्या दोन वर्षांत इतर क्षेत्रे कोविड साथीच्या आजारात कोलमडून पडली तेव्हा शेतीनेच आधार देत देशात सकारात्मक विकास दर कायम राखण्यात मदत केली. मात्र, 2021 मध्ये दर दोन तासांनी किमान एका शेतमजुराने आत्महत्या करून जीवन संपविल्याने शेतमजुरांसाठी फारशी आशादायक स्थिती नसल्याचे दिसत आहे.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
Farm Labour Suicide | शेतमजूर आत्महत्या चिंताजनक
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालानुसार, 2021 मध्ये 2020 च्या तुलनेत आत्महत्यांच्या संख्येत नऊ टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 च्या तुलनेत तर सुमारे 29 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2021 मध्ये शेतमजुरांनी केलेल्या 5,563 आत्महत्यांपैकी 5,121 आत्महत्या पुरुषांच्या आणि 442 महिलांच्या होत्या.
महाराष्ट्र, कर्नाटकात सर्वाधिक आत्महत्या
या अहवालानुसार, भारतातील शेतमजूर आत्महत्यात सर्वाधिक 1,424 आत्महत्या महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर कर्नाटक (999) आणि आंध्र प्रदेश (584) अशा शेतमजूर आत्महत्या नोंद झाल्या आहेत. याशिवाय, सरकारी यंत्रणेने अनेक आत्महत्या या अपघाती मृत्यू म्हणून नोंद करवून घेतल्याने पीडित कुटुंब सरकारी मदतीपासून वंचित राहिले आहेत.
शेतीतून नव्हे तर शेतमजूर म्हणून येतेय उत्पन्न
केंद्र सरकारची ही धक्कादायक आकडेवारी अशा वेळी समोर आली आहे, जेव्हा अनेक शेतकरी हे मजूर बनले आहेत. देशभरात आता अनेक शेतकरी कुटुंब हे शेतातील उत्पन्नापेक्षा मजुरीवर जास्त अवलंबून आहेत. 2021 मध्ये जाहीर झालेल्या जमीन आणि पशुधन याबाबत राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणानुसार काही भागातील शेतकरी कुटुंबाचे सरासरी सर्वाधिक उत्पन्न 4,063 रुपये होते, विशेष म्हणजे हे शेतीतून आलेले उत्पन्न नव्हते तर शेतमजूर म्हणून काम केल्याच्या बदल्यात मजुरी होती.
शेतकरी आत्महत्यांत घट झाल्याची नोंद
गेल्या दोन वर्षांत शेतमजुरांनी अधिक प्रमाणात आत्महत्या केल्या असल्या तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मात्र कमी झाल्याची नोंद अहवालात आहे. शेतकरी आत्महत्यांची संख्या 2019 मध्ये 5,957 होती. ती 2020 मधील 5,579 वरून 2021 मध्ये घटून 5,318 इतकी झाली. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाणही महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातच सर्वाधिक होते. तथापि, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील शेतकरी आत्महत्यांची संख्या शेतमजुरांच्या तुलनेत जास्तच होती. या राज्यात 2,640 शेतकऱ्यांनी आणि 1,170 शेतमजुरांनी आत्महत्या केल्या.
छोट्या राज्यात शून्य शेतकरी, शेतमजूर आत्महत्या
2021 मध्ये शेती क्षेत्रात गुंतलेल्या एकूण 10,881 व्यक्तींनी आत्महत्या केल्या, जे देशातील एकूण आत्महत्यांपैकी (1,64,033) सुमारे 6.6 टक्के होते. पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, त्रिपुरा, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, चंदीगड, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरी सारख्या काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शेतकरी तसेच शेतमजुरांच्या आत्महत्यांची शून्य नोंद झाली आहे.
शेतकरी, शेतमजूर यांच्या व्याख्या
एनसीआरबी अहवालात ज्याचा व्यवसाय शेती आहे आणि त्यामध्ये जे स्वतःच्या जमिनीवर शेती करतात तसेच जे शेतमजुरांच्या सहाय्याने किंवा त्याशिवाय भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनीवर, इतरांच्या जमिनीवर शेती करतात त्यांचा समावेश शेतकरी म्हणून केला गेला आहे. तर, ‘शेतमजूर’ ही अशी व्यक्ती आहे, जी प्रामुख्याने शेती, फलोत्पादन क्षेत्रात काम करते आणि ज्याचे उत्पन्नाचे मुख्य साधन हे कृषी मजुरी हेच आहे.
इतर क्षेत्रांतही रोजंदारी मजुरांच्या आत्महत्येत वाढ
2021 मध्ये देशात आत्महत्या केलेल्यांमध्ये शेतीसह सर्वच क्षेत्रातील रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. 2021 मध्ये 42,004 मजूर आत्महत्या झाल्या. एकूण आत्महत्या करणाऱ्यांमध्ये रोजंदारीवर काम करणाऱ्यांचे हे प्रमाण 25 टक्के होते. 2021 मध्ये रोजंदारीवर कमावणारे हा सर्वात मोठा व्यवसाय गट बनला आहे. 2020 मध्ये 33,164 रोजंदारी कामगारांच्या आत्महत्यांची नोंद झाली होती. आकडा खूप वाढला आहे.
या अहवालात रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या आकडेवारीत शेतमजुरांना वगळण्यात आले आहे. परंतु अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्यांनी गेल्या दोन वर्षांत शेतमजूर म्हणूनही काम केले आहे. कोविड साथीत जेव्हा अनेक आर्थिक घडामोडी बंद पडल्या आणि शहरांतून खेड्यांकडे उलटे स्थलांतर झाले. शहरात उत्पन्नाचे कोणतेही स्रोत नसताना शेतीतील तसेच कृषीपूरक, प्रक्रिया उद्योगातील मजुरीने अनेकांना रोजगार दिला होता.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
कृषी मूल्य आयोगाला बळ देणारे प्रख्यात भारतीय कृषी अर्थतज्ज्ञ, पद्मभूषण अभिजित सेन यांचे निधन
पशुधनावरील लम्पी स्कीन व्हायरसची साथ आली महाराष्ट्रात, राज्यातील पहिला मृत्यू पुणे जिल्ह्यात ; “ॲग्रोवर्ल्ड”ने महिनाभरापूर्वी केले होते खबरदार