छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत एकरकमी परतफेडीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफीची प्रक्रिया अजूनही सुरु असून यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना च्या हिश्श्याची रक्कम भरण्यासाठी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत मुदतवाढ देण्याचे ठरविले आहे. अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
सदर योजनेत एक रक्कम परतफेड करण्यासाठी ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. 1.50 लाखाच्या वर आहे, अशा शेतकऱ्यांना रुपये 1.50 लाखावरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये 4.50 लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्जमाफी देण्यात येते. सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरुन त्यांना चालू खरीप हंगामामध्ये पिककर्ज घेणे सुकर होईल असे आवाहन सहकारमंत्री श्री. देशमुख यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे 50 लाख खातेदारांना रुपये 24 हजार 310 कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे 44 लाख खातेदारांना रु. 18 हजार 500 कोटींचा लाभ देण्यात आला आहे असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.