मुझफ्फरपूर : चांगल्या पगाराची आणि सर्व सोई सुविधांयुक्त नोकरी मिळाली असेल आणि ती देखील दिल्ली सारख्या शहरात तर कोणीही नोकरी सोडण्याचा साधा विचारही कोणी मनात आणणार नाही. मात्र याला मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कर्मपूर येथील दोघे इंजिनिअर भाऊ अपवाद ठरले आहेत. या दोनही भावंडानी दिल्ली येथील अभियंत्याची नोकरी सोडून गाव गाठले आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. आज हे इंजिनिअर ब्रदर्स एकात्मिक पद्धतीने शेती करीत असून त्यातून ते वर्षाकाठी 20 लाखांचे उत्पन्न घेत आहेत. उच्च शिक्षित या दोघं भावंडांनी तरुणांसमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
मनात काही तरी करण्याची जिद्द असेल तर त्यात यश मिळाल्याशिवाय राहत नाही. मुजफ्फरपूर जिल्ह्यातील कर्मपूर गावात राहणारे आयुष कुमार आणि कुशल कुमार यांनी देखील जिद्दीला पेटत शेती करण्याचा निर्णय घेतला आणि यात यश देखील मिळविले. आयुष कुमार हा मॅकेनिकल इंजिनिअर तर कुशल कुमार इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कम्युनिकेशन इंजिनिअर असून त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजधानी दिल्ली येथे चांगल्या पगारावर नोकरी करण्यास सुरुवात केली.
टोमॅटोला ‘या’ बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वाधिक दर
https://eagroworld.in/tomato-fetches-the-highest-price-in-this-market-committee-11-7-2023/
कोरोनामुळे परतले घरी…
या विषयी बोलतांना आयुष सांगतात की, कोरोना महामारीच्या काळात सर्वत्र भिती पसरली होती. त्यामुळे कुटूंबियांनी देखील आमच्यावर घरी परत येण्यासाठी दबाव आणला. कुटूंबियांच्या दबावामुळे आम्ही दोघे भाऊ नोकरी सोडून घरी परतलो. घरी परतल्यानंतर पुढे काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी कुटूंबियांनी वडीलोपार्जित 40 एकर शेतीत काही तरी नवीन करण्याचा सल्ला दिला.
एकात्मिक पद्धतीने करतायेत शेती
कुटूंबियांनी दिलेल्या सल्ल्यानंतर दोघा भाऊंनी शेती करण्याच्या कामाला सुरुवात केली. सर्वात आधी त्यांनी मशरुमची शेती केली. आता ते मागील काही वर्षांपासून 10 एकर क्षेत्रात एकात्मिक पद्धतीने शेती करत आहेत. सोबतच एक एकराच्या क्षेत्रात पारंपारिक पद्धतीने देखील शेती करीत आहेत. ज्यामधून त्यांची चांगली कमाई होत आहे. या व्यतिरिक्त त्यांनी शास्त्रीय पद्धतीने लिची या लागवड केली असून त्यातून उच्च दर्जाच्या फळांचे उत्पादन घेत आहेत. शेतीतून मिळणार्या उत्पन्नाबाबत बोलतांना आयुष सांगतात की, या कामातून चांगली कमाई होत आहे. शेतीतून जितकी कमाई होत आहे, त्याच्या फक्त 10 टक्के कमाई आम्ही नोकरीतून करत होते, असेही ते सांगतात.
शेतीला दिली उद्योगाची जोड
आयुष कुमार सांगतात की, त्यांच्याकडील एकूण शेत जमीनपैकी 12 एकरात त्यांनी शाही लिचीचे 1100 रोपांची लागवड केली आहे. यातून मिळणार्या उत्पादनावर अवलंबून न राहता या लिचीच्या बागेला उद्योगाची जोड दिली आहे. त्याअंतर्गत 200 झाडांच्या लिचीपासून ज्युस, रसगुल्ला आणि मनुखे बनविले जात असल्याचेही ते सांगतात. यातून कमीत कमी 1 लाख 10 हजार रुपयांपर्यंत कमाई होते. यातून शेतीला लागलेला खर्च वजा जाता 40 हजार रुपये निव्वळ नफा राहतो. उरलेली लिचीची फळे विक्री केली जातात. त्यातून देखील 5 लाख रुपयांपर्यंत कमाई होत असल्याचेही ते सांगतात.
मुजफ्फरपुर येथून घेतले प्रशिक्षण
लिचीपासून विविध प्रकारची उत्पादने बनविण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय लिची अनुसंधान केंद्र, मुशहरी, मुजफ्फरपूर येथून प्रशिक्षण घेतले आहे. पुढे बोलतांना कुशल कुमार सांगतात की, शेतीला नवीन पद्धतीने सामावून घेण्याचे काम आम्ही सर्वात पहिले केले. आम्ही दोघे भाऊ 10 एकर शेती एकात्मिक पद्धतीने करत असल्याचेही ते सांगतात. त्यांनी एकात्मिक पद्धतीने अधिक उत्पादन देणारी पद्धत अवलंबली आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
8 ते 9 जणांना रोजगार
कौशल आणि आयुष यांनी एक लक्ष निवडून त्यांवर सातत्याने काम केले. आपली इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आज लाखो रुपये तर कमवितच आहेत शिवाय 8-9 लोकांना रोजगार देखील देत आहेत. इंजिनिअर बंधू सांगतात की, जे लोक शेतीला तोट्याचा व्यवसाय समजणार्यांनी आमच्या शेतात येवून पाहावे, असेही ते सांगतात.
मत्सपालन आणि बरेच काही
एकात्मिक शेती पद्धतीच्या मदतीने हे दोघे भाऊ 1 एकर क्षेत्रावरील तलावात मत्स पालन, 1 एकर क्षेत्रात मशरुम लागवड, 3 एकरमध्ये फळझाडांची आणि 4 एकर क्षेत्रात भाजीपाला लागवड तर एक एकर क्षेत्रात नैसर्गिक पद्धतीने शेती करीत आहेत. शेतीला जोडधंदा म्हणून शेळी आणि गावठी कोबड्या देखील ते पाळत आहेत. या विषयी बोलतांना कौशल सांगतात की, या सर्वांमधून कमीत कमी 20 लाखांपर्यंत कमाई होत आहे. परंतु, शेतीला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने करण्यासाठी उत्पन्नाचा बहुतांश भाग हा शेतीमध्येच लावला जात आहे. यामुळे आमच्या नफ्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे सांगून 2025 पर्यंत या शेतीतून 30 लाखांपर्यंत उत्पन्न मिळू शकेल, असा विश्वासही ते व्यक्त करतात.