मुंबई : उत्तर-मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भातील पावसाला यंदा “एल निनो”चे (EL Nino) ग्रहण लागल्याची स्थिती आहे. त्यामुळे यंदा पाऊस सह्याद्री घाटमाथा परिसरातच अडकलेला दिसत आहे. परिणामी कोकण, पालघर, मुंबई-ठाणे वगळता राज्यात पावसाची तूट मोठी आहे. कोल्हापूर, पुणे, नाशिक परिसरातही फक्त घाटमाथा क्षेत्रातच पाऊस होत आहे. येते काही दिवस अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता दिसत आहे.
मान्सून नव्याने सक्रीय झाल्यापासून गेल्या 5-7 दिवसात राज्याच्या कोकण-मुंबई परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. काल, रविवारी काही भागात झालेल्या पावसाचा अपवाद वगळता उर्वरित राज्यातली बहुतांश भागात मात्र पावसाचा जोर फारच कमी आहे. येते काही दिवस हीच स्थिती कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. “एल-निनो” प्रभाव याला कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. “स्कायमेट”नेही “एल निनो”मुळे मान्सून प्रभावित होण्याची भीती व्यक्त केली आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
बंगालच्या उपसागरात उपयुक्त प्रणाली नाही
यंदाचा मान्सून अजून सह्याद्री घाटमाथा क्षेत्रातच अडकून पडल्याचे दिसतेय, असे हवामान खात्यातील निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी “ॲग्रोवर्ल्ड”ला सांगितले. त्यामुळे पावसाचा जोर फक्त मुंबईसह लगतच्या प्रदेशात दिसत आहे. तिथे अगदी मुसळधार सुरू आहे. राज्याच्या उर्वरित बहुतांश भागात मात्र अतिशय नगण्य ते किरकोळ पाऊस दिसत आहे. मुंबईतून पूर्वेकडे म्हणजेच उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा परिसराकडे आगेकूच करण्यासाठी आवश्यक असणारी ऊर्जाच मान्सूनला अजून मिळत नाही. त्यासाठी आर्द्रतायुक्त वारे अरबी समुद्रातून यावे लागतात, बंगालच्या उपसागरात प्रभावी अशी कमी दाबाची मान्सून प्रणाली विकसित होणे आवश्यक असते. सध्या अरबी समुद्रातून आर्द्र वारे वाहत असले तरी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा मजबूत पट्टा नाही. त्यामुळे सह्याद्रीकडून मध्य-महाराष्ट्र, मराठवाडामार्गे विदर्भाकडे पावसाचे ढग खेचले जात नाहीत.
कमी दाबाचे क्षेत्र सध्या सध्या बंगाल उपसागरात असले तरी ते प्रभावी नाही. वायव्येकडे म्हणजेच विदर्भ, छत्तीसगडकडे आगेकूच करणारी मान्सून प्रणाली तूर्तास अतिशय कमजोरच आहे. वेगाने मान्सून खेचून घेण्यास आणि पाऊस कोसळण्यास मदत करण्यासाठी त्या प्रणालीची ताकद अपुरी पडत आहे. ‘एल निनो’च्या प्रभावातून ही कमजोरी आली असण्याची शक्यता हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली.
एल निनोच्या प्रभावामुळे ‘इंडियन ओशन डायपोल’चा (IOD) प्रभावही सध्या कमकुवत झाला आहे. आयओडी मजबूत असती तर उत्तर मध्य-महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उर्वरित महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडला असता. मात्र आयओडी कमकुवत असल्यामुळे सध्या कोकण मुंबई वगळता इतरत्र तसा अत्यल्प पाऊस होत आहे. महाराष्ट्राच्या काही भागात तर अत्यंत नगण्य पाऊस आहे. हिंगोलीत पावसाची 98% इतकी मोठी तूट आहे.
मान्सूनसाठी मदत करणाऱ्या या काळातील सर्व प्रणाली सध्या अस्तित्वात आहेत. तरीही कमी दाबाचे प्रभावी क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार न होणे, हा मान्सूनवर अप्रत्यक्षपणे “एल निनो”चाच प्रभाव असल्याचे मतही खुळे यांनी व्यक्त केले.
जुलैमधील राज्यातील नियमित सरासरी पाऊसमान
1. महिन्यातील सरासरी पावसाचे दिवस 14.7
2. मासिक सरासरी पाऊस
679 मिमी – 1994
629 मिमी – 2015/2022
543 मिमी – 2018
3. कमाल सरासरी मासिक तापमान – 39.9°C
(40.6°C – 1992, 2014)