नवी दिल्ली : द्वारका हे नवव्या शतकापासूनचे धार्मिक स्थळ … द्वारका हे गुजरातमधील एक सागरी पुरातत्त्वीय स्थळ आणि हिंदूंचे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र. ते गुजरातच्या देवभूमी द्वारका जिल्ह्यात (2013 पूर्वीचा जामनगर जिल्हा) आहे. तेथे द्वारकाधीशाचे मंदिर आहे. ही नगरी श्रीकृष्णाने समुद्र बारा योजने मागे हटवून वसवली आणि त्याच्या निधनानंतर ती समुद्रात बुडाली, अशी कथा आहे.
परंपरेनुसार द्वारकेचा असा संबंध महाभारताशी व श्रीकृष्णाच्या जीवनाशी असल्याने या नगरीचा शोध सुमारे शंभर वर्षे घेतला जात आहे. या संबंधात साहित्यिक पुराव्यावर आधारित आणि पुरातत्त्वीय पद्धतीने भरपूर संशोधन झाले आहे. द्वारकेच्या शोधाच्या संदर्भात पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून बेट द्वारका आणि मूळ द्वारका ही दोन स्थळेदेखील महत्त्वाची आहेत. श्रीकृष्णभक्ती व हिंदुधर्मीयांच्या श्रद्धेशी निगडीत असल्याने समुद्रात बुडालेल्या द्वारकेच्या शोधाला प्रसार माध्यमांमध्ये भरपूर प्रसिद्धी मिळाली आहे.
मार्कंडेय पुराणाचे भाषांतर करताना ब्रिटिश प्राच्यविद्या संशोधक एफ. ई. पार्जिटर यांनी द्वारका नगरी रैवतक पर्वताजवळ असल्याचे म्हटले होते. भारतविद्येचे ज्येष्ठ अभ्यासक ए. डी. पुसाळकर यांनी सध्याची द्वारका हीच प्राचीन द्वारका असल्याचे मत मांडले होते. 1963 मध्ये डेक्कन कॉलेजच्या झैनुद्दीन अन्सारी व म. श्री. माटे यांनी द्वारकेत उत्खनन केले. तेथे त्यांना प्रारंभिक ऐतिहासिक काळातील (इ.स. पहिले शतक) व मध्ययुगीन वसाहतीचे पुरावे मिळाले; तथापि द्वारकेसंबंधी पुराणांमधील माहिती व मौखिक परंपरेतील उल्लेख अधिक महत्त्वाचे आहेत, असे मानणाऱ्यांनी द्वारका फक्त दोन हजार वर्षे जुनी असल्याचे मान्य केले नाही.
‘तण देई धन’ नेमकी संकल्पना काय ?
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/RFlShtyef_4
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणातर्फे एस. आर. राव यांनी 1978-80 मध्ये द्वारकाधीश मंदिराच्या प्रांगणात केलेल्या उत्खननात इ.स. नवव्या शतकातील विष्णू मंदिराचे अवशेष मिळाले. त्यानंतर राव यांनी 1981 पासून केलेल्या संशोधनात द्वारकेच्या समुद्रात आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. 1500) अवशेष मिळाल्याचे व श्रीकृष्णाच्या समुद्रात बुडालेल्या द्वारकेचा शोध लागल्याचे जाहीर केले; तथापि ही कालनिश्चिती वैज्ञानिक पद्धतीने केलेली नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तसेच पाण्यात मिळालेली दगडी बांधकामे आणि अन्सारी व माटे यांना मिळालेल्या प्रारंभिक ऐतिहासिक काळातील दगडी भिंती यांच्यात साम्य आहे.
राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थानाने सन 1990-91 आणि पुन्हा 1997 ते 2002 या काळात पाण्याखालील पुरातत्त्वीय संशोधन मोहिमा पूर्ण केल्या. साधारण एक चौ. किमी. परिसरात 25 मीटर खोलीपर्यंत सर्वेक्षण करण्यात आले. मिळालेल्या अवशेषांमध्ये घडीव दगडांच्या अर्धवर्तुळाकार भिंती व इतर दगडी रचना यांचा समावेश होता. त्यातल्या एका दगडावर गुजराती भाषेतील काही अक्षरे कोरलेली होती.
द्वारकेला बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी एक दगडी धक्का बांधवून घेतला असल्याची माहिती पाहता पाण्याखालील दगडी बांधकामे विसाव्या शतकातील असल्याचे अनुमान काढण्यात आले आहे. सर्वेक्षणात गोमती नदीच्या मुखापाशी समुद्रात एक किमी. अंतरापर्यंत 8 ते 10 मी. खोलीवर अनेक दगडी नांगर पडलेले आढळले. परंतु द्वारकेला आद्य ऐतिहासिक काळातील (इ.स.पू. 1500) वसाहत असल्याचा व ती समुद्राच्या पाण्यात असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नाही.
एकंदर सागरी पुरातत्त्वीय संशोधनातून असे दिसते की, द्वारका प्रारंभिक ऐतिहासिक काळात अस्तित्वात असली व किमान इ.स. नवव्या शतकापासून द्वारका हे वैष्णव पंथाचे महत्त्वाचे धार्मिक स्थळ असले, तरी पाण्याखालील उत्खननात एखादी नगरी समुद्रात बुडल्याचा कोणताही थेट पुरावा मिळालेला नाही. फक्त एस. आर. राव यांचे संदर्भ देऊन व नंतरच्या संशोधनाकडे काणाडोळा करून श्रीकृष्णाची 3550 वर्षे जुनी द्वारका सापडली असल्याचा दावा करणारे बरेच लेखन वर्तमानपत्रांमध्ये व पुरातत्त्वीय क्षेत्राबाहेर इतरत्र प्रसिद्ध झाले आहे; तथापि कोणताही ठोस पुरावा नसताना असा दावा करणे हे छद्मपुरातत्त्वाचे उदाहरण ठरते. राव हेही आता हयात नाहीत. 2013 मध्ये त्यांचे वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.
तुम्हाला या खालच्या बातम्याही आवडतील. संबंधित बातमीच्या लिंकवर क्लिक करा 👇
नायगारा फॉल्स : 10,000 वर्षांपूर्वी निसर्गाला पडलेले अद्भुत स्वप्न अन् त्यासंदर्भातील रंजक प्रेमकथा, दंतकथा जाणून घ्या
चीनची अजस्त्र भिंत.. जिला जगातील सर्वात लांब कब्रस्तान तसेच याव्यतिरिक्त काही आश्चर्यही या भिंतीशी जोडलेली आहेत.. काय आहे या भिंतीमागची रहस्यं जाणून घेऊ…
Comments 3