सध्या राज्यातील सकाळच्या तापमानात घट होताना दिसत आहे. दुसरीकडे चक्रीवादळ ‘तेज’चे ओमानजवळ उद्या लँडफॉल होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील ‘हामन’ही तीव्र होत आहे.
आधीच्याच हवामान अंदाजानुसार, नवीन आठवडा सुरू होत असताना राज्यात सकाळच्या तापमानात घट झाली आहे. पुण्यात आज किमान तापमान 18.2°C नोंद झाले. कालच्या 22.3°C तापमानात अवघ्या 24 तासात 4.1°Cने घसरण झाली आहे.
नाशिकच्या किमान तापमानात 2 अंशांची घसरण
नाशिकमध्ये आज किमान तापमान 17.8°C नोंद झाले. काल किमान तापमान 19.8°C होते. शहराच्या किमान तापमानात 24 तासात 2 अंश सेल्सिअस घसरण झाली आहे. नागपूरमध्येही 17.2°C किमान तापमान नोंद झाले.
तेज चक्रीवादळ अपडेट
23 ऑक्टोबर रोजी दुपारी तेज चक्रीवादळ ओमान आणि येमेन किनार्याकडे वेगाने घोंघावत आहे. नुकतेच सोकोत्रा बेट ओलांडून त्याची आगेकूच सुरू आहे. उद्या पहाटेपासून तेज चक्रीवादळाची लँडफॉल प्रक्रिया सुरू होणार आहे. अल गयाध जवळ ते विसर्जित होण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रातील तेजचा 140 किमी प्रतितास पर्यंतच्या वाऱ्याचा वेग ओमान व येमेन या प्रदेशांवर परिणाम करेल. जोरदार वारे, पाणी साचणे, पॉवर ग्रीड निकामी होणे, मुसळधार पाऊस इत्यादींमुळे नुकसान होऊ शकते. रात्री वादळ हळूहळू कमकुवत होईल आणि उद्या सकाळी लँडफॉल करेल.
बंगालच्या उपसागरातील वादळ तीव्र होतेय
पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात पारादीपच्या दक्षिणेस सुमारे 400 किमी अंतरावरही वादळ तीव्र होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) माहितीनुसार, तीव्र दाबाचा पट्टा चक्रीवादळात तीव्र होण्याची शक्यता आहे . बुधवारी संध्याकाळी वादळ उत्तर-पूर्वेकडे सरकून खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडेल. पश्चिम बंगाल आणि ओडिशावर सध्या तरी त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता नाही.