पुर्वजा कुमावत, शेंदुर्णी –
यशस्वी महिलांची व्याख्या केवळ त्यांच्याकडे असलेल्या संपत्ती किंवा प्रसिद्धीवर आधारित नाही. यशस्वी महिला म्हणजे त्या स्त्रिया, ज्यांनी आपल्या कर्तृत्व, मेहनत आणि धैर्याच्या जोरावर समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आजकाल आपल्याला अशा अनेक महिलांची उदाहरण पाहायला मिळतात, ज्या नव्या क्षेत्रांमध्ये वाव निर्माण करत आहेत आणि समाजाला नवा मार्ग दाखवत आहेत. एक अशीच महिला आहे, ज्यांनी ड्रोन तंत्रज्ञान शिकून त्याच्यावर आपला व्यवसाय सुरू केला. त्यांनी त्यांच्या पतीसोबत मिळून ड्रोन तयार केले आणि शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांवर ड्रोनच्या साहाय्याने फवारणी करून दिली. यामुळे शेतकऱ्यांच्या वेळेची आणि श्रमांची बचत झाली. त्यांना अधिक उत्पादन मिळवण्यास मदत झाली. यातून त्या महिन्याला 60,000 ते 70,000 रुपयांचा नफा कमावत आहे.
आज विविध क्षेत्रांमध्ये महिला आपली छाप सोडत आहेत जसे की व्यवसाय, शिक्षण, राजकारण, कला, विज्ञान, तंत्रज्ञान आणि क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रात त्या आपले नाव करत आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील बुरुंजवाडी (ता. शिरूर) या गावातील 24 वर्षीय महिला नूतन टेमगिरे (नळकांडे) या पहिल्या ड्रोन पायलट म्हणून ओळखल्या जातात. नूतन टेमगिरे यांचे लग्न प्रवीण बापूसाहेब नळकांडे यांच्याशी झाला आहे. नूतन व प्रवीण यांना एक छोटी दोन महिन्याची मुलगी आहे. त्यांना त्यांच्या पतीचा व सासरकडील व्यक्तींचा पूर्णपणे पाठिंबा आहे.
ड्रोनचे घेतले प्रशिक्षण
आजच्या काळात लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन व मजुरांची कमतरता असल्यामुळे नूतन यांनी स्वतः ड्रोन प्रशिक्षण घेतले. हे प्रशिक्षण त्यांनी पदवी पूर्ण झाल्यानंतर घेतले. मराठा कुणबी लोकांसाठी असलेले मोफत प्रशिक्षण त्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे घेतले. हे प्रशिक्षण त्यांचे तीन टप्प्यात झाले पहिले म्हणजे ड्रोनबद्दल त्यांना संपूर्ण माहिती दिली गेली, त्यानंतर ड्रोन कसे हाताळायचे हे त्यांना प्रत्यक्षात शिकवले गेले.
शेवटच्या टप्प्यात त्यांना ड्रोन चालवायला दिला. त्यांनी ड्रोन हातात घेतल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही पण त्यांनी स्वतःला धीट बनवले. नूतन व त्यांचे पती प्रवीण यांनी नचा पार्ट्स संबंधित माहिती घेतली व ते पार्ट्स त्यांनी स्वतः हैदराबाद येथे जाऊन खरेदी केले. नूतन यांचे पती प्रवीण यांनी ड्रोनचे पार्ट्स असेंबल केले व त्यात सॉफ्टवेअर टाकून ड्रोन तयार केला. काही अडचणी आल्यास त्यांनी इंटरनेटची मदत घेतली.
महिन्याला 60 ते 70 हजारांचा नफा
नूतन यांनी 2024 मध्ये ड्रोन फवारणी करण्याचे काम चालू केला. नूतन या स्वतः लोकांच्या शेतात फवारणी करण्यासाठी जातात. त्या एका एकरची फवारणी करण्यासाठी आठशे रुपये घेतात. लागलेला खर्च काढून त्यांना महिन्यातील नफा 60 ते 70 हजार रुपये येतो. ड्रोनचा खर्च व येण्या-जाण्याचा खर्च हा गावाच्या अंतरावर अवलंबून असतो. नूतन या शिरूर तालुक्यात बऱ्याच गावांमध्ये ड्रोनची फवारणी करण्यासाठी जातात.
नूतन यांच्याकडे 6 ते 7 एकर शेती आहे. त्या ड्रोनचे बाहेरील कामे करून शेतीतील कामेही करतात. ऊस व मका हे मुख्य पीक ते लागवड करतात आणि 20 गुंठ्यामध्ये ते ऑरगॅनिक पद्धतीची शेती करतात. ऑरगॅनिक शेतीमध्ये त्यांनी गवार, भेंडी, मेथी सर्व प्रकारच्या भाज्या लागवड केल्या आहेत. ऑरगॅनिक शेतीमध्ये ते निंबोळी अर्क, शेणखत, स्लरी, गोमूत्र यांची फवारणी करतात. ऊस व मका यातील उत्पादन हे एकरी 90 ते 95 टन निघते.
संपर्क :-
सौ. नुतन टेमगिरे
मो. 9322056117
