पूर्वजा कुमावत
अझोला एक जलचर फर्न वनस्पती आहे. ही वनस्पती पाण्याच्या पृष्ठभागावर वाढते. कमी खर्चात तयार होणारे जनावरांसाठी पौष्टिक खाद्य म्हणून अझोला उत्तम पर्याय आहे. दुधाळ गाई व म्हशी यांच्या आहारात अझोलाचा वापर केल्यास दूध उत्पादन वाढते. कोंबड्यांच्या आहारात अझोलाचा वापर केल्यास अंडी उत्पादनात वजन वाढीवर अनुकूल परिणाम होतो. अझोला हे गुरेढोरे, मासे, डुक्कर, ससे, मेंढ्या, शेळ्या आणि कुक्कुटपालनासाठी एक आदर्श खाद्य आहे. अझोला हे जैव खत म्हणून वापरले जाते. या पिकाची लागवड चीन, व्हिएतनाम आणि फिलीपिन्स इ. देशांमध्ये लोकप्रिय आहे. हे पीक नायट्रोजन स्थिर करण्यास मदत करते. अझोलामध्ये खूप जास्त प्रथिने, अमीनो ऍसिड, जीवनसत्वे,( व्हिटॅमिन A, व्हिटॅमिन B 12, बीटा कॅरोटीन) व खनिजे आहेत. अझोला हा प्राण्यांना सहजरित्या पचतो. भात शेतीत अझोलाचा वापर केल्यास उत्पादनात 20% वाढ होते. तण नियंत्रणासाठी भात शेतीत, अझोला एक झाड थर तयार करतो व सर्व शेत क्षेत्र व्यापतो आणि सेंद्रिय मल्चिंग म्हणून काम करतो.
लागवड प्रक्रिया
अझोला तयार करण्यासाठी जागा सपाट आणि तणरहीत करून घ्यावी. अझोला लागवडीसाठी कृत्रिम तलाव तयार करावा लागतो. तलाव तयार करण्यासाठी छायांकित क्षेत्र निवडावे, कारण अझोलाला 30% सूर्यप्रकाश आवश्यक असतो व जास्त सूर्यप्रकाशामुळे पिक नष्ट होते. तलाव तयार करण्यासाठी मोठ्या व छोट्या आकाराचाही बनवू शकतो किंवा मार्केटमध्ये प्लास्टिकचे बेड उपलब्ध असतात तर आपण तेही वापरू शकता. खड्ड्यामध्ये 10 ते 15 किलो चाळलेली सुपीक माती समप्रमाणात पसरवून घ्यावी. पाण्याची नासाडी टाळण्यासाठी प्लास्टिकचा कागद जमिनीवरती पसरवावी. यानंतर 10 लिटर पाण्यामध्ये चांगले कुजलेले शेण 5 किलो, 30 ते 35 ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि 20 ग्रॅम खनिज मिश्रण मिसळून घ्यावे व हे द्रव मातीवर सारख्या प्रमाणात पसरवून घ्यावे. खड्ड्यामध्ये स्वच्छ व ताजे पाणी 10 सेंटीमीटर उंचीपर्यंत भरावे व त्यातील मिश्रण तळाला स्थिर झाल्यानंतर 1.5 ते 2 किलो ताजा व शुद्ध अझोला पाण्यावर सोडावा. 10 ते 15 दिवसानंतर अझोला ची वाढ झालेली दिसून येते. अशाप्रकारे एका खड्ड्यातून दररोज 1.5 ते 2 किलो अझोला चे उत्पादन मिळते.

काय काळजी घेतली पाहिजे
अझोलाची चांगली वाढ होण्यासाठी दर आठ दिवसांनी 1 ते 2 किलो शेण व 30 ग्रॅम सुपरफॉस्फेट, 20 ग्राम खनिजे मिश्रण पाण्यात मिसळावे. दर 10 दिवसांनी खड्ड्यातील 25% पाणी बदलवावे व दर दोन महिन्यानंतर पन्नास टक्के माती बदलून नवीन सुपीक माती टाकावी. यात शेणाचा वापर जास्त करू नये. मुंग्या, वाळवी, किडे यापासून बचाव करावा. खड्ड्यातील पाण्य पातळी 4 ते 5 इंचापर्यंत कायम ठेवावी जेणेकरून अझोलाची मुळे खड्ड्यातील अन्नघटक चांगल्या प्रकारे शोषून घेतील. याला झाकण्यासाठी शेडनेटचा वापर करावा. पाण्याचा सामू (PH) 6.5 ते 7.5 इतका असावा जेणेकरून अजून याची वाढ चांगली होते व जास्त क्षार असलेल्या पाण्यात अझोलाची वाढ होत नाही. तलावातील कल्चर हे दर सहा महिन्याने बदलवावे. तयार झालेला अझोला रोज काढावा अन्यथा थर जमा होऊन रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो व अझोला खराब होतो.
आता सौर कुंपण योजनेसाठी 100 टक्के अनुदान ! वाचा.. संपूर्ण माहिती
पशुंना अझोला देण्याची पद्धत
अझोला वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवावा, कारण अझोला शेणाचा वास येत असल्यामुळे तो जनावर खात नाही. अझोला देताना पशुखाद्यात 1:1 या प्रमाणात मिसळून द्यावा त्यानंतर हळूहळू अझोलाचे प्रमाण वाढवावे. प्रतिदिन जनावरांना एक ते दीड किलो अझोला खायला द्यावा.
अझोलाचे फायदे
पशुखाद्याचा 20 ते 25 टक्के खर्च कमी होतो. पशु आहारात अझोलाचा वापर केल्यास दूध उत्पादनात 15 ते 20% वाढ होते व त्याचबरोबर दुधातील फॅटचे प्रमाण वाढते. कोंबड्यांमध्ये अंडी देण्याचे प्रमाणही वाढते व ब्रॉयलर कोंबड्यांचे वजन लवकर वाढते. अझोला वाफ्यातून काढण्यात येणाऱ्या पाणी हे नत्रयुक्त व खनिजयुक्त असल्याने पिकांसाठी किंवा झाडांसाठी उपयुक्त असते. अझोला मध्ये नत्राचे प्रमाण अधिक आहे व याचा हिरवळीचे खत म्हणून देखील वापर होतो.
