नाशिक – यंदाच्या महाविक्रमी पावसाने खान्देशातील धरणे फुल्ल झाली आहेत. त्यामुळे जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामाचे आजिबात टेन्शन नाही. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे असलेल्या गिरणा धरणासह सर्व लहान-मोठे धरण तसेच तापी नदीवरील बॅरेजही काठोकाठ भरल्याने यंदा जबरदस्त रब्बी हंगामाची अपेक्षा आहे. विशेष म्हणजे मका व भाजीपाला लागवड क्षेत्र वाढीसह एकूणच रब्बी क्षेत्रातही मोठ्या वाढीचे संकेत कृषी विभागाने दिले आहे.
हतनूर, वाघूरमध्ये 100% पाणीसाठा
गिरणा पाटबंधारे विभागाकडून 14 ऑक्टोबर रोजी प्राप्त माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील हतनूर आणि वाघूर ही धरणे 100% भरलेली आहेत. गेल्या वर्षीही ही दोन्ही धरणे या तारखेपर्यंत 100% भरलेली होती. धुळे जिल्ह्यातील अक्कलपाडा आणि नंदुरबार जिल्ह्यातील वीरचक्र धरणही पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत.
“गिरणा”वर अवलंबून 153 गावांना दिलासा
उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 18.48 टीएमसी क्षमतेचे गिरणा धरणही 100 टक्के भरले आहे. गेल्या वर्षीही या तारखेला गिरणा धरण 100% भरलेले होते. गिरणा धरणातून जळगाव जिल्ह्यातील 153 गावे, 130 पाणीपुरवठा योजना आणि 7 नगरपालिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. गिरणा धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या भागाचा पाणीप्रश्न सुटणार आहे.
मका, भाजीपालासह रब्बीचे क्षेत्र वाढणार – तडवी
जळगाव जिल्ह्यातील प्रमुख धरणांसह इतरही लहान-मोठ्या धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे. परिणामी, रब्बीसाठी सिंचनाची सोय झाल्यामुळे यावर्षी मका, भाजीपाल्याची लागवड वाढून एकूण रब्बीतील लागवड क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज असल्याचे जळगावचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी यांनी ॲग्रोवर्ल्डशी बोलताना सांगितले.
हतनूर विसर्गाने सारंगखेडा, प्रकाशा बॅरेज फुल्ल
जळगाव जिल्ह्यातील 7 तर धुळे जिल्ह्यातील 5 मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत. 9 टीएमसी क्षमतेचे हतनूर धरणही 100% भरलेले आहे. हतनूर धरणातून पाण्याचा विसर्गाने सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमध्येही पूर्ण क्षमतेने पाणी साठा आहे.
धुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्व प्रकल्प फुल्ल
जळगाव जिल्ह्यातील अभोरा, मंगरुळ, सुकी, तोंडापूर, अंजनी बोरी व मन्याड हे सात प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. धुळ्यातील पांझरा, मालनगाव, जामखेडी, कनोली व मुकटी हे पाच प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
पांझरा नदीला 35 वर्षानंतर महापूर
यंदा धुळ्यात 35 वर्षांनंतर पांझरा नदीला महापूर आला होता. शिवाय, अक्कलपाडा धरणही यंदा 28 दिवस आधीच तुडुंब भरल्याने धुळे शहराला पाणीकपातीच्या संकटातून दिलासा मिळाला. साक्री तालुक्यातील आदिवासी भागात असलेले काबऱ्याखडक, लाटीपाडा, मालनगाव, जामखेली प्रकल्प भरलेले आहेत. मालनगाव धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले होते.
वीरचक्र फुल्ल, नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला
नंदुरबार जिल्ह्यातील सुसरी आणि इच्छागव्हाण धरण भरलेले आहेत. यंदा दरा धरणही ओव्हरफ्लो झाले होते. जिल्ह्यातील मुख्य वीरचक्र धारण फुल्ल झाल्याने नंदुरबारचा पाणी प्रश्न मिटला आहे.
नाशिक विभागात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठा पाणीसाठा
नाशिक विभागातील 22 मोठ्या प्रकल्पात आजअखेर, 99.98% पाणीसाठा आहे. मध्यम प्रकल्पात गेल्या वर्षी 67% पाणीसाठा आहे, तो आज 78.26% इतका आहे. विभागातील लघु प्रकल्पात गेल्या वर्षी 44.55% पाणीसाठा होता, तो आज 58.70% इतका आहे. छोट्या आणि लघु प्रकल्पातील वाढलेला गाळ ही उपयुक्त पाणीसाठ्यात मोठी अडचण ठरत आहे. फक्त नाशिक जिल्ह्याचे बघितले तर बहुसंख्य धरणेही तुडुंब भरलेली आहेत. यंदा 20 धरणातून सातत्याने विसर्ग केला गेला. आजअखेर, नाशिक जिल्ह्यातील धरणसाठा 53 टीएमसीवर आहे.