मुंबई – गेल्या 2-3 आठवड्यापासून दडी मारून बसलेल्या पावसाने पुन्हा सक्रिय होत राज्यात जोरदार पुनरागमन केले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे लागोपाठ दोन क्षेत्र निर्माण झाल्याने राज्यभरात पावसाचा जोर वाढत आहे. कोकणासह मुंबईत तर शुक्रवारपासून जोरदार पाऊस सुरू आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून 5 जिल्ह्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. आपणही आपल्या जिल्ह्यासाठीचा अलर्ट आणि स्थिती जाणून घ्या.
आज पुढील काही तास मुसळधार पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. काही भागात कमी वेळात अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता देखील आहे.
सध्याच्या मुसळधार पावसाचा जोर का?
बंगालच्या उपसागरात दक्षिण ओडिशा किनाऱ्यालगत आणि उत्तर आंध्र प्रदेशात अशी लागोपाठ दोन कमी दाबाची क्षेत्रे कार्यरत असतानाच विदर्भ आणि परिसरावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. मध्य-पूर्व बंगाल उपसागरापासून ते थेट राजस्थानात जगदलपूरपर्यंत कमी दाब क्षेत्राचे केंद्र सक्रिय आहे. सध्या रतलाम, उदयपूर ते जैसलमेर असा हा कमी दाबाचा पट्टा कार्यरत असून तो मान्सूनचा आस आहे. त्यामुळे अरबी समुद्रात ईशान्येकडे गुजरातपासून ते थेट कोकणा-गोवा किनारपट्टीलगत वाऱ्यांची चक्राकार स्थिती आहे. त्यातून सध्या राज्यातील पावसाचा जोर वाढला आहे.
पावसाबरोबरच बोचणारी थंड हवा
गुजरातपासून अरबी समुद्राच्या कोकण किनारपट्टी ते मराठवाड्याच्या उत्तर भागापर्यंत कमी दाबाच्या दोन्ही केंद्रांदरम्यान 1.5 ते 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत पूर्व-पश्चिम हवेचा कमी दाबाचा पट्टाही कायम आहे. राज्यात सध्या पावसाबरोबरच बोचणारी थंड हवा त्यामुळेच वाहत आहे. या दोन्ही कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढून, ही प्रणाली मंगळवारी जमिनीवर येण्याची शक्यता आहे. या जोडीलाच, विदर्भ परिसरावर आणखी एक नवे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे. त्यामुळे समुद्रसपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहू लागले आहेत. ही नवी प्रणाली पश्चिमेकडे सरकत असून, ती आज गुजरातकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यातील पाऊस वाढविण्यास या दोन्ही प्रणाली पोषक ठरत आहेत.
21 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरात सक्रिय कमी दाबाच्या पट्ट्याबरोबरच कोकण किनारपट्टी ते मराठवाड्यापर्यंत वाहणाऱ्या चक्राकार वाऱ्यामुळे भारतीय हवामान खात्याकडून 17 ते 21 दरम्यान अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आजही राज्यातील तब्बल पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. अधिकच्या अतिवृष्टी इशाऱ्यामुळे भूस्खलनाच्या अनुषंगाने सर्व आवश्यक कार्यवाहीसाठी जिल्हा प्रशासनांना कळविण्यात आले आहे. या दरम्यान समुद्राची स्थिती खवळलेली व ताशी 50-60 किमी वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन आयएमडीकडून करण्यात आले आहे.
राज्यातील “या” जिल्ह्यांसाठी आज रेड अलर्ट
कोकण आणि घाटमाथ्यावर आज अतिवृष्टीचा इशारा (रेड अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणात या कालावधीत सर्वाधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. राज्यातील घाटमाथ्यावरही आज पावसाचा जोर वाढणार आहे. त्या दृष्टीने पाच जिल्ह्यांना हवामान विभागाकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. कोकणात रत्नागिरी, रायगडसह पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा घाट परिसर या भागात अतिवृष्टी होण्याचा धोका आहे.
दुग्धव्यवसाय कार्यशाळा.. अॅग्रोवर्ल्डतर्फे जळगावात 24 ऑगस्टला..
“या” जिल्ह्यांना “ऑरेंज अलर्ट”
अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली.
“या” जिल्ह्यांना “यलो अलर्ट”
मेघगर्जनेसह पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नाशिक, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, नांदेड, हिंगोली, वाशिम, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया.