मुंबई : काही ठराविक वर्षांनी जगभरात अल नीनो आणि ला नीनाचे परिणाम दिसून येतात. सामान्यतः या दोन्ही संकल्पना प्रशांत महासागराशी संबंधित असतात, पण त्याचा थेट परिणाम मान्सूनच्या पावसावर होतो. त्यामुळे संपूर्ण जगावर त्याचा फटका बसतो. नवीन वर्षात ला नीना साठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.
जागतिक हवामान विभागाच्या माहितीनुसार, सध्या भारतासह जगभरातील वातावरण सामान्य आहे. मात्र, पुढील वर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ला नीनासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात ला निना सक्रिय होण्याची शक्यता 55 टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जात आहे.
भारतीय मान्सूनवर परिणाम
ला निनाचा प्रभाव जगाच्या दक्षिण आणि उत्तर गोलार्धात वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो. ला नीना सक्रिय झाल्यास दक्षिण गोलार्धात उष्णतेची तीव्रता प्रचंड वाढते, ज्यामुळे वणवे सारख्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता असते. याच्या उलट, उत्तर गोलार्धात कडाक्याची थंडी पडते. भारतीय उपखंडात मात्र, ला निनाचा परिणाम उष्णतेसोबतच मान्सूनच्या पावसावरही होतो. जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जर जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ला नीना सक्रिय झाले, तर भारतात पुढील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो.
भारतात चांगल्या पावसाची शक्यता
जेव्हा अल निनोचा प्रभाव असतो, तेव्हा मान्सूनसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सरासरी इतकाही पाऊस होत नाही आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र, जागतिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील वर्षी भारतासह जगावर ला निनाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. यामुळे देशात पावसाचे प्रमाण चांगले राहण्याची शक्यता असून, काही भागांमध्ये अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे.
नवीन वर्ष महाराष्ट्रासाठी धोक्याचे ?
महाराष्ट्रात यंदा अतिवृष्टीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर, जर यावर्षी ला निनाचा प्रभाव राहिला, तर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा अतिवृष्टीसारख्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. मात्र, मान्सूनसाठी सामान्य परिस्थिती निर्माण झाल्यास राज्यात यंदा चांगला आणि संतुलित पाऊस पडू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
तुम्हाला हेही वाचायला आवडेल. 👇
आजचे कापूस बाजारभाव : या बाजार समितीत मिळाला इतका भाव !
रब्बी हंगामातील पीक विम्यासाठी अर्जाची अंतिम संधी ; उद्या शेवटचा दिवस!