मुंबई (मंत्रालय प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली.
सध्या देशात 50 % पशुवैद्यकांची कमतरता असून सन 2035 पर्यंत 1 लाख 25 हजार पशुवैद्यकांची गरज भासणार आहे. राज्याने पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांची संख्या दुप्पट करण्याची गरज आहे. सध्या पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता अनुक्रमे 405 आणि 240 आहे. राज्यात सुमारे 6 हजार 600 पशुवैद्यकीय पदवीधरांची आवश्यकता आहे. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात सध्या 2 हजार 500 पशुधन विकास अधिकारी कार्यरत असून पशुधनाची संख्या 3 कोटी 33 लाख 79 हजार 118 इतकी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी येथील सावली विहीर खुर्द येथे सुमारे 75 एकर जागेवर हे महाविद्यालय स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी एकूण 234 नियमित पदे आणि 42 अशैक्षणिक पदे बाह्य स्त्रोतांकडून भरण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी एकूण 107 कोटी 19 लाख रुपये खर्च येणार आहे. तसेच उपकरणे, यंत्रसामग्री, इमारती इत्यादींवर 346 कोटी 13 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता
- इलेक्ट्रिक बुल… आता बियाणे पेरणी.. फवारणी.. निंदणी – कोळपणी या आंतरमशागतीच्या कामांसह पिकांना मातीची भर लावण्याचेही काम करणार…. इलेक्ट्रिक बुल…