मुंबई : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेली बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात मोठा बदल करण्यात आला आहे. बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन आणि जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य सरकारने वाढ केली आहे.
जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि सिंचनाची सुविधा उपलब्ध करुन देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविण्यात येत असते. महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गत ST शेतकरी लाभ घेऊ शकता. तसेच या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतून बारमाही उत्पन्न घेता येणार आहे. दरम्यान, आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत नवीन आणि जुन्या विहिरीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य सरकारने वाढ केली असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
विहिरी अनुदानात झाली वाढ
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून आता नवीन विहिरीसाठी आता 4 लाख रुपये अनुदान देण्यात येईल तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपये अनुदान दिले जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेच्या माध्यमातून आधी नवीन विहिरीसाठी अडीच लाख रुपये अनुदान देण्यात येत होते तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 50 हजार रुपये अनुदान दिले जात होते.