मुंबई : भुईमुग (bhuimug pik) हे एक तेलबिया वर्गातील महत्वाचे पिक आहे. त्यामुळे गहू, हरभरा, मका, ज्वारी आदी पिकांइतकेच प्राधान्य भुईमुगाची लागवड करण्याला दिले जाते. भुईमुगाची लागवड करतांना कोण कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत व लागवडीनंतर काय काळजी घेतली पाहिजे, या विषयीची माहिती आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
भुईमुग हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तिनही हंगामात या पिकाची लागवड केली जाते. भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. मात्र पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे व फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान साधारणत: 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. भुईमुगाच्या लागवडीसाठी मध्यम परंतु पाण्याचा चांगला निचरा होणारी, वाळू व सेंद्रिय पदार्थमिश्रित जमीन योग्य असते. जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: 12 ते 15 सें.मी. एवढी असली पाहिजे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023 🌱
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागून पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आर्या तुटून शेंगा जमिनीत राहू शकतात. परिणामी उत्पादनात घट होवू शकते. भुईमुगाच्या लागवडीसाठी भुसभुशीत जमिनीची निवड करणे फायदेशिर ठरते. कारण भुसभुशीत जमिनीत हवा खेळती राहते, त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आर्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. तसेच शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
या दरम्यान करा पेरणी
रब्बी हंगामात भुईमुगाची पेरणी 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत तर उन्हाळी भुईमुगाची पेरणी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करणे फायदेशिर असते. भुईमुगाची पेरणी करतांना उपट्या जातीसाठी 30/10 सें.मी. तर निमपसर्या जातीसाठी 30/15 सें.मी. पेरणीतील अंतर ठेवावे. तसेच भुईमुगाची पेरणी सपाट वाफा पद्धतीने करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर 30 सेंमी व दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.
असे करा खताचे व्यवस्थापन
भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्यक असतात. 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 400 किलो जिप्सम असे प्रमाण ठेवावे. त्याचबरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. स्फुरदयुक्त खते सिंगल सुपर फॉस्फेटद्वारे दिल्यास त्यामध्ये असलेल्या गंधकाचा भुईमुगासारख्या पिकास चांगला फायदा होतो. पेरणीच्या वेळी 200 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे, तर उर्वरित 200 किलो जिप्सम हे आर्या सुटताना द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते.
शेत तण विरहीत ठेवण्यासाठी करा हे काम
भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या 15-20 दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या 10-12 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 35-40 दिवसांनंतर आर्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल. तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
असे करा पाणी व्यवस्थापन
भुईमुग पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 12 ते 13 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फुले येण्याच्या अवस्थेपासून 22-30 दिवस ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आर्या सुटण्याची अवस्था पेरणीपासून 40-45 दिवस, शेंगा पोसण्याची अवस्था पेरणीपासून 65-70 दिवस या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये. आर्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
कीड व रोग नियंत्रण
मावा, फूलकिडे, तुडतुडे प्रादुर्भाव दिसताच 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, दुसरी फवारणी 15 दिवसांनंतर डायमिथोएट 500 मिली. प्रति 500 लिटर पाण्यातून फवारणी करावी. पाने खाणारी व पाने गुंडाळणारी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस 20 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी, टिक्का रोग नियंत्रणासाठी मॅन्कोझेब 2 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. तांबेरा रोग नियंत्रणासाठी हेक्साकोनॅझोल 1 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी. असे केल्यास भुईमुगाच्या उत्पादनात चांगली वाढ होवू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇