मुंबई : शेतकऱ्यांनो, तुमच्या भागात थोडाफार पाऊस झाला की लगेच पेरणी करू नका; पेरणीयोग्य पुरेसा पाऊस होईपर्यंत धीर धरा, असे आवाहन पुन्हा एकदा राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे आणि कृषी तज्ञांनीही शेतकऱ्यांना सबुरीचा सल्ला देत, थोड्या पावसावर घाई न करण्याची सूचना केली आहे.
पेरणीसाठी योग्य पाऊस म्हणजे त्या भागात 100 मिलिमीटर पाऊस झालेला असावा. किमान 75 मिमी तरी असावा. आपापल्या भागात 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग
https://youtu.be/vJ7zM35MvpM
गेल्या अनेक वर्षांच्या रितीनुसार, अनुभवी शेतकरी जून महिना उजाडताच पेरणीच्या तयारीला लागतो. अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करून ठेवतात. यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी आपली बियाणे खरेदी केली आहे. पहिला पाऊस आला की लगेच अनेक शेतकरी पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. मात्र, एका पावसात शेतातील माती पुरेशी ओल धरत नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता पेरणीयोग्य 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांनी बदललेले ऋतुमान आणि खरिप हंगामाचे लांबलेले चक्र लक्षात घेण्याचा सल्ला कृषी अभ्यासक देतात.
मुंबई, मराठवाड्यात जूनच्या शेवटाला मुसळधार पाऊस
मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार, जूनच्या शेवटाला मुंबईसह मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत तर हा पाऊस आतापर्यंतची जूनमधील तूट भरून काढेल, असे सांगितले जात आहे. काही संस्थांच्या हवामान अंदाजानुसार, जूनअखेर मुंबईत सरासरीपेक्षा 500 मिमी अतिरिक्त पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 23 ते 29 जूनदरम्यान मराठवाड्यातही सरासरीपेक्षा अधिक पाऊस असण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात 25 जून ते 1 जुलैदरम्यान कमाल व किमान तापमान हे सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. पाऊस मात्र सरासरीपेक्षा जास्त राहू शकेल.