शहादा : येथील प्रेस मारुती मैदानावर 10 ते 13 फेब्रुवारी 2023 दरम्यान ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या या चार दिवसात हजारो शेतकऱ्यांनी भेटी दिल्या. शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकारी व शासकीय अधिकारी यांनी देखील प्रदर्शनाला भेट देवून ॲग्रोवर्ल्डने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
पदाधिकारी, अधिकाऱ्यांच्याही भेटी
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे उदघाट्न जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी केले. निर्मल सीड्सचे संचालक डॉ. सुरेश पाटील, ओम गायत्री नर्सरीचे अध्यक्ष मुरलीधर गवळी यावेळी उपस्थित होते. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावीत, उपाध्यक्ष सुहास नाईक, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, शहादा न. पा. चे माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, दोंडाईचा येथील रावळ उद्योग समूहाचे अध्यक्ष सरकारसाहेब रावळ, शहादा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, उपविभागीय कृषी अधिकारी तानाजी खर्डे, शहाद्याचे तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे आदींनी प्रदर्शनादरम्यान भेट देवून स्टॉलधारकांकडून माहिती जाणून घेतली. कृषी व कृषी क्षेत्राशी निगडीत क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.
हे राहिले प्रमुख आकर्षण
पिकांवर फवारणी करणारे ड्रोन, मजूर समस्या तसेच करार शेतीला पर्यायी पिके व यंत्रे, विविध पिकांसाठीचे एकत्रित ब्लोअर, फळपिके तसेच घरातील रोपांसाठीच्या नर्सरीचे स्टॉल याठिकाणी उपलब्ध होते. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यासह धुळे तसेच सीमावर्ती भागातील गुजरात, मध्यप्रदेश येथूनही हजारो शेतकऱ्यांनी या प्रदर्शनास भेट देवून माहिती जाणून घेतली.
प्रदर्शन दरवर्षी घेण्याची मागणी
शहादा येथील अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञान, मजुरीला पर्यायी पिके व यंत्रे, ड्रोन, कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारी पिके पाहून भारावलेल्या शेतकऱ्यांनी अॅग्रोवर्ल्डने दरवर्षी असे कृषी प्रदर्शन आयोजित करावे व शेतकऱ्यांना बदलत्या काळाशी जोडावे, अशी मागणी आयोजकांना केली.